सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावातील काही समाजसेवी तरुणांनी एकत्र येऊन ६ मार्च २०१६ रोजी साद संवाद स्वच्छता या ग्रुपची स्थापना केली. सहा वर्षापासून प्रत्येक रविवारी " एक तास गावासाठी" या संकल्पनेतून चालू झालेला हा ग्रुप आजपर्यंत अविरतपणे गावाच्या विकासासाठी कार्यरत आहे.
दर रविवारी हे ४० ते ५० तरुण एकत्र येतात आणि गावातील शाळा परिसर , मंदिर परिसर , रस्ते , गल्ल्या , बाजारतळ , स्मशानभूमी अश्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करतात. गावात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, व्याख्याने, समाजातील विधायक कार्यासाठी काम करत असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, महिलादिन,शिक्षकदिन , सैनिक दिन इ.उपक्रमांचे आयोजन साद संवाद ग्रुप दरवर्षी सातत्याने करत आहे. केरळ पूरग्रस्तांना २१ हजार रु.निधी व कोल्हापूर पूरग्रस्त भागातील शाळेसाठी ३६ हजार रुपयांच्या स्कुल बॅग ग्रुपने देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली. ऊसतोड कामगार मुले , डोंबारी समाज , पारधी समाज यांना स्वेटर, जुने परंतु उत्तम स्थितीतील कपडे घरोघरी जाऊन जमा करून त्यांचे वेळोवेळी वाटप , गावातील होतकरू मुलांना आर्थिक मदत,पाणी फाऊंडेशन कार्यात सहभाग, सोमेश्वर मंदिर वृक्षारोपण मोहिमेत सहभाग, कोरोना काळात गरजवंतांना किराणा साहित्याची मदत,कोरोना योद्धे यांचा सन्मान, लसीकरण जागृती,दिवाळीत लहान मुलांसाठी किल्ले स्पर्धा असे अनेक उपक्रम ग्रुप राबवत आहे. या उपक्रमांना वाणेवाडी ग्रामस्थांनी तसेच गावातील विविध सहकारी संस्थांनी सढळ हाताने मदत केली आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक ,ग्रामपंचायत वाणेवाडी नेहमीच मदतीसाठी सदैव तत्पर असते .गावातील युवक व लहान मुलांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी आदर्श गाव भेटीचे नियोजन ग्रुप वरचेवर करत असतो. ग्रुपच्या वतीने बारामती पश्चिम भागातील पोलीस व सैनिक भरतीसाठी मुलांना उत्तम मैदानाची सोय व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री .अजित पवार यांना निवेदन सुद्धा दिलेले आहे. व पाठपुरावा चालू आहे .आज या ग्रुपमध्ये गावातील लहान मुले,तरुण वर्ग, शेतकरी , डॉक्टर, वकील, शिक्षक, बँक अधिकारी, व्यावसायिक, उच्चशिक्षित तरुण आपला सहभाग नोंदवत आहेत. ग्रुपला आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत. "वाढदिवस साजरा करा साद संवाद सोबत " उपक्रमातून ग्रुपला वृक्षारोपण मोहिमेसाठी भरपूर निधी संकलित होऊन त्याचा उपयोग गावातील वृक्षारोपनासाठी व संवर्धनासाठी झाला.ग्रुपच्या माध्यमातून गावात आजपर्यंत जवळपास पाचशेपेक्षा जास्त देशीझाडे लावून ती जगविण्यात ग्रुपला यश मिळाले आहे. आज ती झाडे पाने , फुले , फळे यांनी समृध्द झाली आहेत . त्याची शितल छाया वाटसरू ना सुखावत आहे .अशा पद्धतीचे निरपेक्ष वृत्ती चे समाजसेवा करणारे ग्रुप पंचक्रोशीतील गावागावात तयार झाले तर नक्कीच गावे आदर्श होतील.