सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शाळेतील कुमारवयीन मुलींना पोटाचा त्रास, पायाला गोळे येणे, हिमोग्लोबिन कमी होणे, उन्हात चक्कर येणे असे त्रास होतात कारण व्यायाम आणि योग्य आहाराचा अभाव. स्नायूंना ताकद येण्यासाठी भाज्या, फळे, कडधान्य या आहारावर आणि कोवळे ऊन घेण्यावर भर द्यावा, असे मत डॉ. तृप्ती पवार-बारवकर यांनी व्यक्त केले.
लोणी भापकर (ता. बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप जगताप, राजश्री भापकर, भाग्यश्री भापकर, गीता भापकर आदी उपस्थित होते.
डॉ. बारवकर म्हणाल्या, कुमारवयातील मुलींना सकस आहाराची आणि व्यायामाची गरज असते. तरच वाढत्या अभ्यासाचा ताण सहन करू शकतात आणि अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता मिळवू शकतात. मासिक पाळीचे त्रास कमी करण्यासाठी पालकाची भाजी, ज्वारी, नाचणी व मोड आलेल्या पदार्थांमधून मॅग्नेशिअम मिळवा. कोवळ्या उन्हात दररोज बसल्याने निसर्गाकडून आपोआप विटॅमीन डी मिळू शकते. ते नसेल तर चिडचिडेपणा वाढतो. आयर्न मिळविण्यासाठी काळे खजूर, काळे मनुके, सफरचंद, अंजिर व लाल रंगाची फळे, भाज्या खाव्यात. भाज्यांमध्ये लिंबाची फोड मिळाली की सी विटॅमिन मिळते आणि मैद्याचेही पदार्थ पूर्णपणे टाळा. सुनिता नांगरे यांनी प्रास्ताविक केले, शारदा भापकर यांनी सूत्रसंचालन केले तर सुजाता सुतार यांनी आभार मानले.
--