मी जोपर्यंत आहे... तोपर्यंत अजितदादांच्याच सोबत : सतीश काकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
यशवंत भोसले यांनी अजितदादांनाही फसविले होते त्यामुळे कामगारांनी त्यांच्यापासून दूर रहावे. अजितदादा, बच्चू कडू यांची आपल्याला मदत होत आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत अजितदादांच्याच सोबत राहणार असल्याचा शब्द शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे यांनी दिला. 
           नीरा (ता. पुरंदर) येथे ज्युबिलंट कामगार युनियनचे अध्यक्ष असलेल्या सतीश काकडे यांनी कंपनीकडून मिळालेल्या मानधनातून युनियनच्या कामगार सदस्यांचा सपत्नीक सत्कार करत त्यांना सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा करंडा व संपूर्ण पोशाख भेट म्हणून प्रदान केला. याप्रसंगी सौ. पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सतीश काकडे होते. याप्रसंगी बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सदस्या नीता फरांदे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता काकडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, उद्योजक आर. एन. शिंदे, तेजश्री काकडे, राजेश काकडे, ऍड. गौरव पोळ उपस्थित होते.
         सुनेत्रा पवार म्हणाल्या, कोरोना काळात आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना सलाम. कामगारांनीही अशीच भूमिका वठविल्याने व्यवस्थेला गती मिळाली. ज्युबिलंटच्या कामगारांना योग्य दिशा देणारा व महिलांना भाऊबिज देणारा मोठा भाऊ सतीश काकडे यांच्या रूपाने मिळाला आहे. राष्ट्रावदीच्या कामगार सेलचे राज्याध्यक्ष शिवाजी खटकाळे म्हणाले, स्वतःचं मानधन कामगारांना देतो हे राज्यातील पहिलं उदाहरण पाहिलं. आता संघटनेच्या घटनेत अध्यक्षांचं मानधन कामगारांना वाटण्याची तरतूद करा. तसेच केंद्रसरकारने केलेल्या कामगारविरोधी कायद्याबाबतही भूमिका घेणार असल्याचे सांगितले.
          सतीश काकडे म्हणाले, स्थानिक लोकांना कमी करून दिल्लीमधील लोक सुरक्षा विभागात, कंत्राटी पद्धतीत आणले जात आहेत. याबाबत अधिकाऱ्यांशी बोलू आणि स्थानिकांना जास्तीत जास्त काम कसे मिळेल ते पाहू. एकाही कामगाराला धक्का लागणार नाही पण कामगारांनीही अनुचित काम करू नये. यशवंत भोसले यांनी अजितदादांनाही फसविले होते त्यामुळे कामगारांनी त्यांच्यापासून दूर रहावे. अजितदादा, बच्चू कडू यांची आपल्याला मदत होत आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत अजितदादांच्याच सोबत राहणार. माझी काहीही अपेक्षा नाही. पुणे जिल्हा बँकेला मी अर्ज माघारी घेतला होता. अजितदादांना बिनविरोध निवडून दिले. अजितदादांना आपण बँकेत संचालक म्हणून जावे असा आग्रह केल्याचेही ते म्हणाले. तसेच कारखान्याच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी, पवार कुटुंबिय सर्वांचे प्रश्न सोडविण्यात कटीबध्द आहे. त्यामुळेच त्यांना मताधिक्य मिळते. सतीश काकडे यांनीही अर्ज माघारी घेऊन अजितदादांना जिल्हा बँकेवर बिनविरोध पाठविले, असे मत मांडले. कामगारांच्या वतीने प्रवीण जैन, जनार्दन काकडे यांनी मनोगत मांडले. 
           सुरेश कोरडे यांनी प्रास्ताविक केले. मदन काकडे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीलदत्त देशमुख यांनी आभार मानले.

To Top