सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
१७ एप्रिल २०१९ रोजी नीरा पंचक्रोशीतील कंपनीमध्ये झालेल्या विषारी वायू गळती ला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. आजही मरणाचे भय कायम आहे. त्यावेळी काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. त्यामुळे थोडक्या वर निभावले नाहीतर जनतेबरोबर कंपनीला मदत करणारेही निरुपयोगी ढिगार्यात सामील झाले असते.
विषारी वायू गळती च्या घटनेमध्ये दोन जीव गेले व ५० ते ६० बाधित झालेले अजूनही यातना भोगत आहेत. आज पर्यंत प्रदूषणामुळे जग सोडून गेले ते वेगळेच.
विषारी वायू गळती संदर्भात जबाबदार असणारा वर कुरकुंभ, डोंबिवली व तामिळनाडू प्रमाणे गुन्हे दाखल होऊन बाधितांना न्याय मिळणे क्रमप्राप्त होते परंतु कंपनीने शासकीय यंत्रणा आणि स्थानिक जनतेचे सेवक यांना आपलेसे करून घेतल्याने तेच जनतेचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी कंपनीला मदत करीत आहेत. जनतेची ज्या नेत्यांच्या वर श्रद्धा आहे. त्या नेत्यांचेच या प्रश्नावर दुर्लक्ष का आहे हा एक संशोधनाचा भाग आहे.
न्यायव्यवस्थेने कंपनीचे प्रदूषणाबाबत योग्य त्या कार्यवाही साठी शासकीय यंत्रणेला आदेश दिले आहेत. परंतु शासकीय यंत्रणा कंपनीला जावयाला सारखी वागणूक देऊन जनतेला वाऱ्यावर सोडत आहे. डोंबिवली येथील प्रदूषण निर्मिती करणारे, जीवितास बाधक ठरणारे व मनुष्य वस्ती जवळ असणारे १५६ कारखाने महाराष्ट्र शासनाने पाताळगंगा येथे हलवण्याचे आदेश दिले आहेत. तोच न्याय नीरा पंचक्रोशीतील मनुष्य वस्ती जवळ असलेल्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या व वेळोवेळी विषारी वायू गळतीस जबाबदार असणाऱ्या कंपनीबाबत जनतेला का मिळत नाही.
नीरा व निंबुत पंचक्रोशीतील राजकीय नेत्यांचे दौरे, यात्रा, छोटे-मोठे कार्यक्रम व विकास कामे याला कंपनी हातभार लावते यासाठी अनेक जण मदतीच्या याचने साठी कंपनीच्या दारात उभे असतात. कंपनीविरुद्ध जनप्रक्षोभ होऊ नये म्हणून कंपनी अशा कार्यक्रमांना मदत करते व कंपनीला वेळोवेळी मदत करणाऱ्यांचेही यामध्ये हात ओले होतात. कंपनीचे कामकाज नियमानुसार सरळमार्गी चालले असते तर कंपनीने कोणालाही दारात उभे न करता अशी खैरात केली असती का.
कंपनीच्या विषारी वायूमुळे एक दिवस निरा पंचक्रोशी चा भोपाळ झाल्यास जनतेबरोबर कंपनीला दुभती गाय समजून मदत करणारे हि राहणार नाहीत.
-------------
टी. के. जगताप
लेखक - सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त पोलीस आहेत