सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
फलटण : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील काळज येथे चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात क्रुझर गाडी पलटी होवून नुकतेच लग्न झालेल्या तरूणाचे गंभीर जखमी झाल्याने निधन झाले.
सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी येथील नवरदेव सुखदेव रवींद्र वाघमोडे वय २६ हा लग्न झाल्यावर देवदर्शनासाठी क्रुझर गाडीतून नातेवाईकासह जेजुरी येथून फलटण तालुक्यातील धुळदेव या ठिकाणी जात असताना संध्याकाळी पाचच्या सुमारास काळज जवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होवून झालेल्या अपघातात नवरदेव सुखदेव हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने फलटण येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतू गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात रात्री ऊशीरा दाखल करण्यात आली.
सद्या फलटण लोणंद मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या सहा पदरीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी ही कामे करत असताना पुरेशी काळजी न घेता रस्ता वळवण्यात आलेला आहे. त्यामुळेच वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघातांच्या घटनांत वाढ झाली असल्याचे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे म्हणणे आहे.