बारामती ! धमक असेल तर साखर कारखाने चालवून दाखवा : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधकांना आव्हान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 विरोधक कारखान्यांच्या बाबतीत आरोप प्रत्यारोप करतात मात्र स्वतः कारखाने चालवायला घेतले की ते मागे सरकतात. आता अनेक जिल्ह्यातील साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे कुणाच्यात धमक असेल तर कारखाने चालवायला घ्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना दिले.
              बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थलांतर प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदोरे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, सरपंच रवींद्र खोमणे व जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
              पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की यंदा पाऊसकाळ चांगला असणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन उसाची लागवड करा. मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांना लवकर साखर कारखाने सुरू करायला मी सांगणार आहे. जिल्हा बँकेत 800 कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे यासाठी राज्य सरकार परवानगी मागत आहे. या भरतीत जिल्ह्यातील युवकांना प्राधान्य मिळायला हवे यासाठी प्रयत्न करणार आहे. कांदा खरेदी नाफेड च्या वतीने करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. शेतकऱ्यांना मदत होईल हाच यामागे हेतू आहे. जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी कमी व्याजदरात 25 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. ही कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी नाबार्ड कडे पत्र व्यवहार करण्याच्या सूचना दिल्या असून व्याजात ही सवलत देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी व सभासदांच्या साठी अनेक योजना सुरू आहेत मात्र हे असताना बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व सभासदांची शेतकऱ्यांशी नम्रपणे वागावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
To Top