सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या शिंदेवाडी ता.खंडाळा येथील एक तरुण बहिणीच्या लग्नासाठी कपड्याची खरेदी करण्यासाठी पुण्याकडे जात असताना ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना पुणे-सातारा महामार्गावर केळवडे गावच्या हद्दीत सोमवार दि.२३ दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली.
अजय रामचंद्र पिलावरे वय २४,रा.शिंदेवाडी ता. खंडाळा जि.सातारा असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर दुचाकीवर असलेला अजयचा साथीदार गौरव हिरामण जाधव रा.शिंदेवाडी ता. खंडाळा हा जखमी झाला आहे.सदर गुन्ह्याची नोंद राजगड पोलीस ठाण्यात झाली असून ट्रकचालक सुरेंद्र शंकर जाधव रा.तळदेव ता.महाबळेश्वर जि.सातारा याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय व गौरव केळवडे गावच्या हद्दीतून पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून एमएच-११ सी ५२६५ जात असताना पाठीमागील ट्रकने एमएच-११ सीयच ६९४२ भरधाव वेगाने येऊन दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना इंडिकेटर न लावता ट्रक डाव्या बाजूला घेतला. यावेळी दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात अजयचा मृत्यू झाला असून गौरव जखमी झाला आहे. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार उमेश जगताप करीत आहेत.