सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज ६९ .३१ इतके मतदान झाले. काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. आ. मकरंद पाटिल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटिल, विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांच्यासह अनेल दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटित बंद झाले.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज २१ संचालक पदासाठी चुरशिने मतदान झाले. एकूण सत्तारूढ मदन भोसले गटाचे २१ तसेच आमदार मकरंद पाटील गटाचे २१ व अपक्ष ४ असे ४६ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यासाठी झालेल्या मतदानात आज वाई, जावली, सातारा, कोरेगाव, खंडाळा तालुक्यातील १५४ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी १२ पर्यंत १६६९६ मतदारांनी ३२.४९ % टक्के मतदान केले तर संस्था मतदार संघातून २२७ मतदारांनी ६१% मतदान केले होते. तर दुपारी २ पर्यंत २५१०७ मतदारांनी ४८.७२ % टक्के मतदान तर संस्था मतदार संघातून २७३ मतदारांनी ७३ % मतदान झाले. ४ वाजे पर्यंत ३२४३२ मतदारांनी ६२.८४% तर संस्था मतदार संघातुन ३०१ मतदारांनी ८२ % मतदान केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे ६८% टक्के मतदान झाले. दिवसभरात अंदाजे ४०००० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कडक उन्हाळ्यामुळे दुपारच्या सत्रात कमी मतदान झाले. तर सकाळी व सायंकाळी मतदानास उत्साह दिसून आला. संस्था मतदार संघात ३७४ पैकी अंदाजे ३१५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.
सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी वाड्यावस्त्यांवरुन आणताना दिसत होते. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी व सहाय्यल निवडणूक निर्णय अधिकारी जी. टी. खामकर मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. गुरुवार दि. ५ रोजी वाई एमआयडीसी येथे मतमोजणी होणार आहे.