सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
एरवी उसाच्या फडात आईवडिलांना मदत करणारी, बैलगाडी हाकणारी किंवा छोट्या भावंडांना सांभाळणारी ऊसतोड मजुरांची मुले आज मात्र गाण्यांच्या ठेक्यावर थिरकत होती. नृत्य, उखाणा, गाणी, वक्तृत्व अशा विविध कला ऊसतोड मजुरांच्या मुलांनी सादर केल्या. परिसरातून उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी त्यांचे कौतुक केलेच पण ऊसतोड मजूरही आपल्या पाल्यांना व्यासपीठावर नाचताना पाहून हरखून गेले होते.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी 'कोपीवरची शाळा' प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पातील मुलांचा नुकताच पार पडलेला 'सांस्कृतिक महोत्सव' डोळे दीपवणारा आणि मुलांना व्यासपीठ देणारा ठरला. २७३ पैकी २०० मुलांनी विविध कलांमध्ये सहभाग घेतला. महोत्सवाचे तसेच चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटनही सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, सराफ संघटनेचे नेते किरण आळंदीकर, संचालक प्रवीण कांबळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव संदीप जगताप, गीतांजली बालगुडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात कार्तिक लोखंडे याच्या 'जय जय कारा', पूजा जेधे हिच्या 'उगवली शुक्राची चांदणी', सृष्टी शिरसाटचे 'सैंया सुपस्टार' या गाण्यांवरील नृत्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. कार्तिकला तीन वेळा नृत्य पेश करावे लागले. 'रब ने बना दी जोडी आन सहा महिने ऊस तोडी' आणि 'नाद एकच बैलगाडा शर्यत' या गाण्यांनीही धमाल आणली. तर 'दूर दूर उभी आहे अशी माझी शाळा' या गाण्याच्या सादरीकरणात ऊस तोडणारी, पाणी भरणारी, मूल सांभाळणारी मुले पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अर्चना सूळचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील विचार आणि काही मुलींचे उखाणेही उपस्थितांना भावले. चला जेजुरीला जाऊ, मी देवाचा धनगरी ही लोकगीतेही पालकांना आवडली. तर समारोपाला झिंगाट गाण्यावर सहभागी मुलांसह चक्क काही पालकही थिरकले आणि ऊसतोडीचा शिणवटा घालविला. अश्विनी लोखंडे, ज्ञानेश्वर पवार, संतोष होनमाने, शरद ननवरे, संभाजी खोमणे, आरती गवळी, रोहित नगरे, शुभम गावडे यांनी संयोजन केले.
प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन माणिक पवार यांनी केले तर आभार नौशाद बागवान यांनी मानले.
---