सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त गावातील एका तरुण मंडळाने पुण्यातील कुख्यात गुंडाचे फ्लेक्स लावले होते मात्र ही बाब निदर्शनास येताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी ते वादग्रस्त फ्लेक्स उतरवले आहेत.
भैरवनाथ यात्रेनिमित्त पुण्यातील एक कुख्यात गुंड कोऱ्हाळे बुद्रुक या गावात येणार होता. गावातील एका तरुण मंडळाने चक्क त्या गुंडाच्या स्वागताचे फ्लेक्स गावात लावले होते. यातील एक फ्लेक्स तर चक्क गावाच्या स्वागत कमानी जवळच लावला होता. विशेष म्हणजे हे फ्लेक्स लावण्यासाठी ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. शिवाय त्या गुंडाच्या जाहीर सत्कार ही घेण्याचे त्या मंडळाचे प्रयोजन होते. मात्र ही बाब काही सुज्ञ ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी अशा गोष्टीने गुन्हेगाराचे उदात्तीकरण होत असल्याची भावना वडगाव निंबाळकर पोलिसांना कळवली. यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस कुमक पाठवत तात्काळ ते वादग्रस्त फ्लेक्स उतरवले व एक चुकीचा संदेश समाजात जाण्यापासून रोखले. वडगाव निंबाळकर पोलिसांच्या तत्परतेचे ग्रामस्थांनी कौतुक केले.