बारामती ! तुकाराम महाराज पालखी सॊहळ्याला मिळणाऱ्या सुविधा सोपानकाका पालखी सोहळ्याला मिळणार : दादासाहेब कांबळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेली दोन वर्ष पालखी सोहळा नसल्याने संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका पालखी सोहळ्याला भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याला दिल्या जाणार असल्याची माहिती बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 
           आज दि १४ रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व संत सोपानकाका पालखी सोहळा विसावा व मुक्काम ठिकाणाची पाहणी करताना सोमेश्वरनगर येथे ते बोलत होते.  यावेळी तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, गटविकास अधिकारी अनिल बागल, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सपोनि सोमनाथ लांडे, बांधकाम विभागाचे पवार, कनिष्ठ अभियंता सचिन म्हेत्रे, योगेश शेलार, संचालक शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, ग्रामसेवक राठोड  सतीश सकुंडे, वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, तुषार सकुंडे, प्रदीप मांगडे, विकास सावंत व पांडुरंग भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कांबळे पुढे म्हणाले की, 
     निंबुत पासून ते इंदापूर हद्दीपर्यंत पालखी सोहळ्याला सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत, जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी,  पोलीस यंत्रणा बंदोबस्त व  ट्राफिक व्यवस्था राखली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधींना देखील जबाबदारी देणार आहोत, सद्या सुरू असलेली रस्त्याची कामे पालखी सोहळ्यापूर्वी  पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर ज्या गावात पालखी असणार आहे त्याठिकाणी दोन दिवस भारनियमन केले जाणार नसल्याची माहिती सोमेश्वर महावितरणचे कनिष्ठ अभियंता सचिन म्हेत्रे यांनी दिली.
To Top