सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काटेवाडी - (प्रतिनीधी )
काटेवाडी (ता. बारामती) येथे धोतराच्या पायघडय़ा टाकून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी 3 वाजता पालखी रथाभोवती पार पडलेल्या मेंढय़ांच्या वैशिष्टय़पूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणो फेडले.
बारामती शहरातुन बुधवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर पिंपळी, लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत काटेवाडीत पालखी सोहळा विसावला. या पालखी सोहळ्याचे बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्र पवार, उद्योजक रणजीत पवार, शरयू फौडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार, विद्या प्रतिष्ट्रानचे विश्वस्त युगेंद्र पवार छत्रपतीचे अध्यक्ष प्रशात काटे,सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, सोसायटीचे अध्यक्ष स्वप्नील काटे आदींनी स्वागत केले. या वेळी पालखी दर्शन मंडपात पालखी नेण्यासाठी परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघडय़ा घालण्यात आल्या.
गावच्या वेशीपासून बँड पथक, श्री छत्रपती हायस्कूलच्या विद्यार्थिनीनच्या लेझीम पथकासमवेत हरिनामाच्या गजरात मोठय़ा उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खाद्यांवरून नेली. त्यानंतर वारकरी भाविकांनी गावामध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. दर्शन मंडपामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता मेंढय़ांचे वैशिष्टय़पूर्ण रिंगण पार पडले. संभाजी काळे, हरि महारनवर, तात्यासो मासाळ यांच्या मेंढय़ांचा त्यामध्ये समावेश होता..