विशेष लेख ! चला पंढरीला : आषाढी वारी : वारकऱ्यांचा पालखी सोहळा

Admin
            
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
नेहमी प्रमाणे संस्कृतीचा,परंपरेचा, पूर्वजांच्या विचारांचा पालखी सोहळा एकदाचा पंढरपूराकडे मार्गस्थ झाला.परिसर,गांव गजबजून गेली तशी निरोपांने हुरहूर लावून गेली.कारण तो सामाजिकतेचा अमोल ठेवा आहे.ऋणानुबंध वाढवत भक्तीभाव जोपासणे हा एकमेव उद्देश... समाजात समरता वाढवणे.स्नेहभाव जोपासणे.सामाजिक मूल्यांची अलिखित जपणूक करणे ही पालखी सोहळ्याची पारंपारिक उदिष्टे.सर्वांना समाधानाचे,तृप्ततेचे वाटप करीत तो मार्ग अक्रमित असतो.करोनाच्या आपत्तीने समाज मन मात्र बैचेन झाले होते.आता मात्र तृप्तता झाली..प्रत्येकांने आपल्या विवंचना,अडचणी भक्तिच्या रुपाने अव्यक्त स्वरुपात देव नावाच्या मनाच्या गाभाऱ्यात वाहिल्या आणि चिंतेचा सुस्कारा सोडला.आता मला काळजी नाही तो माझ्या पाठिशी आहे.मन मन मनाला समजावते तो सर्व आता मनोकामना ही पूर्ण करील.ही त्याच्याशी केवढी मोठी बांधिलकी आणि विश्वास...तसं पाहिलं तर येथे विनिमयाचा कांहीच व्यवहार नाही.पण आध्यात्मिक बांधिलकी..तो माझा कोणी तरी आणि मी त्याचा कोणी तरी..त्याने माझं भलंच करावं ही त्याच्याकडं माझी करुणा.तसं पाहिलं तर तो कोणाचचं कांही लागत नाही तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर ओझं टाकून मोकळे..असो तो ही न कळत मान्य करतो अशी आमची धारणा..या विश्वासावर संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदान मागितलेले दिसते.इथपर्यंत ठिक.पण आपण त्याच्या विश्वासास पात्र राहतो का ? मानव सेवा ही ईश सेवा.म्हणून जीवन जगतो का ? परोपकार हे तत्व घेऊन जीवनात वावरतो का ? दुसऱ्याची वेदना ती माझी वेदना असं मानतो का ? दुसऱ्याच्या दु:खात, अडचणीत सहभागी होतो का ? तर हे सर्व प्रश्न आज तरी निरुत्तर आहेत.कारण समाजात आज उदासीनता, वैफल्यग्रस्तता दिसते.मला त्याचे काय करायचे आहे.माझ्या पुरता मी.अशी संकुचित वृत्ती पाहावयास मिळते.मग आपण देवत्वाचा गहजब का करायचा ? या पालखी सोहळ्याचे दोन दिवस पाहिले तर आजची पिढी मोबाईल द्वारे फोटो काढण्यात व्यस्त होती.वारीत चालणे, वारकऱ्यांसोबत फोटो घेणे,पालखीला खांदा देणे,तुळस डोक्यावर घेऊन दिंडीत चालणे,अष्टगंध लावून फोटो काढणे,प्रसंगी डोईवर फेटा बांधणे हा सगळा दिखाऊबाणा‌.असे फोटो  स्टेटसला ठेवणे,वाटस अपला पाठवणे व मी कसा भक्तवत्सल आहे हे इतरांना दाखवणे.प्रत्यक्ष व्यवहारात ही माणसं अनुभवली तर चित्र वेगळेच दिसते.मग पूर्वजांच्या विचारांचे, संस्कृतीचे आपण वास्तवात अनुकरण करणार आहोत की नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे.पूर्वीचे ते दिवस गेले असे आपणच म्हणतो मग ते सामाजिकतेचे,माणूसकीचे,सुबत्तेचे, वैभवसंपन्नतेचे,आपुलकीचे दिवस आणणार तरी कोण? आता ही जबाबदारी आपल्या पिढीवर आहे.पूर्वज कांहीं स्वर्गातून येणार आहेत थोडेच...म्हणून संस्कार आणि विचारधारा महत्वाची.तिचे अनुसरण करत दुसऱ्याला माणूसकीची अनुभूती देणे गरजेचे वाटते मग समाजात माणूसकीचे राज्य आपोआप प्रस्थापित होईल.पूर्वजांचे दिवस दिसू लागतील.फक्त संकुचित मनोवृत्तीला रामराम घातला पाहिजे. पूर्वजांच्या अमोल ठेव्याचे जतन केले पाहिजे तसेच ते दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द ही केले पाहिजे तरच या सामाजिकतेचा पालखी सोहळा समाजासाठी सार्थकी लागला असे म्हणावेसे वाटेल अन्यथा तो फक्त आनंददायी व मौजेचा म्हणावा लागेल..
----------------------
श्री.एस.एस.गायकवाड सर, 
करंजेपूल
लेखक : शिक्षक व सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. 
To Top