सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
श्री क्षेत्र संगमबेट- वाळकी येथुन प्रस्थान ठेवलेल्या श्री संतराजमहाराज पालखीचे सुपेकरांच्यावतीने तसेच वरुण राजाने उत्साहात स्वागत केले. यावेळी पालखीचे आगमन होताच वरुण राजाने हजेरी लावली. त्यामुळे वरुण राजाचे आगमन होताच ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित झाला. या पालखीने छप्पन मेरु घाटाचे चढण पार करुन सुप्यात प्रवेश करताच येथील सोंड परिसरात पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खैरे, सदस्या रेखा चांदगुडे, राजश्री धुमाळ, अनिल हिरवे, हभप प्रमोदमहाराज जगताप, विलास धेंडे, पालखी प्रमुख सुरेशमहाराज साठे आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी सुपे गावाकडे मार्गस्थ झाली. यावेळी टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठल विठ्ठल म्हणत येथील ग्रामस्थांची भजनी दिंडी आणि शहाजी विद्यालयाची प्रसादिक दिंडी पालखीस सामोरी गेली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. यावेळी पालखी आगमनाने येथील वातावरण भक्तीमय झाले होते. येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी वरच्या पेठेतील शहाजीराजे मैदानावर येताच अश्वमेघाचे मोठे गोल रिंगण होणार होते. मात्र पावसामुळे हा रिंगण सोहळा रद्द करण्यात आला.
त्यानंतर हरिनामाचा गजर करीत मुख्यपेठेतुन पालखी मुक्कामी स्थळाकडे मार्गस्थ झाली. पालखी तुकाई मंदिरात विसावल्यावर सार्वजनिक महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील ग्रामस्थांच्यावतीने मिष्टान्न भोजन वारकऱ्यांना देण्यात आले. यावेळी येथील जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पालखी प्रमुख सुरेश महाराज साठे म्हणाले की, संतराज महाराज पालखी सोहळ्याचे हे ५५ वे वर्षे आहे. करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच मोठ्या संख्येने वारकरी पालखी समवेत आहेत. यावर्षी २०० राहुट्यामुळे वारकऱ्यांची निवाऱ्याची सोय झाली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी वारकऱ्यांसाठी टॅंकरची सोय करण्यात आली आहे. ____________________