सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगनाला भिडली आहे तरुणांमध्ये बेरोजगारी वाढली आहे तरुणांना काम देण्याऐवजी त्यांची माथी भडकवली जात आहेत याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन तर करणारच आहे परंतु कृती कार्यक्रमाद्वारे बेरोजगारांना राज्य सरकारच्या विविध योजना मार्फत आर्थिक मदत करून देण्याचा प्रयत्नही करणार आहे अशी ग्वाही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
करंजेपुल ता बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना व मार्गदर्शन मेळाव्यात आयोजन ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे मा. अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, जितेंद्र निगडे, माजी संचालक रूपंचंद् शेंडकर, लालासाहेब नलवडे, विशाल गायकवाड, उद्योजक संतोष कोंढाळकर, दीपक साखरे, मधुकर सोरटे, विक्रम भोसले, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब शेंडकर, प्रवीण सूर्यवंशी, शिवाजीराव गायकवाड, निलेश शिंदे, तानाजी सोरटे आदी मान्यवर उपस्थित होते. होळकर पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याने कर्ज प्रकरणे होत आहेत. या कर्ज प्रकरणात ३ लाखापर्यंत व्याज परतावा मिळत असतो. त्यामुळे बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा. तालुकाचा परिसराचा व कुटुंबाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हेच यामागील मूळ उद्देश असल्याचे होळकर यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, कारखान्याचे विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळे वाहतूक यंत्रणेची जादा गरज पडणार आहे त्यामुळे युवकांनी या महामंडळाच्या माध्यमातून या व्यवसायात उतरावे. कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या मुलांना काही मदत लागली तर केली जाईल. पुढील हंगामात देखील कारखाना २०० दिवस कारखाना चालवावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे सदस्य पृथ्वीराज नलवडे म्हणाले, या महामंडळाच्या माध्यमातून महिन्याला १६ कोटी रुपये वाटप करण्यात येतात.आतापर्यंत पुणे जिल्हाला १४ कोटी व्याज परतावा मिळाला आहे. यामध्ये कोणताही व्यवसाय तुम्ही करू शकता यासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या आत असावे, आधार, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रहवाशी दाखला अशी कागदपत्रे लागतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन प्रदीप मांगडे यांनी तर आभार आकाश सावळकर यांनी मानले.