सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील वीसगाव चाळीसगाव खोऱ्यात गुरुवार दि.२३ पावसाने जोरदार हजेरी लावली असून खरिपातील पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून बळीराजाला पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.
जून महिना संपत आला तरी मान्सूनचे आगमन झाले नसल्याने बळीराजा धास्तावला होता. बळीराजाने खरीप पेरणीपूर्व शेती मशागत पूर्ण केली होती.मागील पंधरा दिवसांपासून पेरणीसाठी पावसाकडे बळीराजाचे डोळे लागून राहिले होते. पावसाने गुरुवारी सकाळपासूनच वीसगाव खोऱ्यातील नेरे,खानापूर तर चाळीसगाव खोऱ्यातील आंबवडे, कारी,आंबेघर परिसरात हजेरी लावली.पावसाच्या आगमनाने खरिपातील भात तसेच कडधान्य पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. उशिरा का होईना पेरण्या सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.तर निगुडघर ,हिरडस मावळ परिसरातील धूळ वाफेवर पेरणी केलेले भात रोप तरारले असल्याचे चित्र आहे.