सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सुपे : सुदाम नेवसे
रुढी रितीरीवाज ,परंपरेनुसार समाजामध्ये श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचे पालन होऊन समाजाच्या विकासाची गती मंदावली गेली .समाजामध्ये अनेक धर्म ,जाती, पोटजाती निर्माण झाल्या. प्रत्येक धर्माचे ग्रंथ निर्माण झाले. तत्त्वज्ञान वेगवेगळे झाले परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पना, त्याच्याजवळ जाण्याचे मार्ग ,त्याला प्रसन्न करण्यासाठीच्या क्लुप्त्या वेगवेगळ्या सांगितल्या गेल्या. यातूनच समाजामध्ये धार्मिक वर्चस्वाची कल्पना आकाराला आली. कोणत्या धर्माचा देव श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी धार्मिक युद्ध, मारामारी ,खून अशा प्रकारच्या हिंसक मार्गाचा अवलंब केला गेला. यातूनच विविध जाती धर्माचा विनाश झाला. अशा प्रकारच्या घटना आपण वाचलेल्या आहेत. अनुभवल्या आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले, शहाजीराजांचा परगणा असलेले बारामती तालुक्यातील सुपे याला अपवाद आहे.
या गावामध्ये अठरापगड विविध जाती धर्माचे लोक राहतात. विविध धार्मिक ग्रंथानुसार ते परमेश्वराची करुणा भाकतात. प्रत्येक जण कौटुंबिक जबाबदारीच्या जाणिवेची बांधला असून कसलयाही प्रकारचा तंटा ,हेवेदावे ,मत्सर न करता गुण्यागोविंदाने प्रत्येक धर्माचा आदर करीत एकमेकांमध्ये मिळून-मिसळून वागतात .हे पाहिल्यावर नक्कीच जगातले आठवे आश्चर्य पाहिल्या प्रमाणे आपल्याला अनुभूती होईल. मात्र ते त्रिकालाबाधित सत्य आहे. याचे कारण म्हणजे सुप्याच्या मातीत हिंदू-मुस्लीम समतेचे बीज रुजूविणारा येथील शाहमन्सूर बाबा दर्गा. मनोभावे पूजन केल्यास भक्तांच्या नवसाला पावणारा जीवनाला स्थैर्य आणि मानसिक पराकोटीचे समाधान देणारा येथील शाहमन्सूर बाबा दर्गा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते .प्रत्येक गुरुवारी सुपे परिसर व जिल्ह्यातून बाबांच्या दर्शनासाठी गर्दी होते .भक्तगण मनोभावे बाबांच्या चरणी माथा टेकवत आपले दुःख बाबांना सांगतात आणि आवारातील पायरीवर विसावतात तत्क्षणी मन प्रसन्न होऊन क्लेश, पीडा दूर झाल्याची जाणीव होते .बाबांच्या रुपाने एक अद्भुत शक्ती मंदिरामध्ये वास करीत असल्याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही .याच भावनेतून काही भाविक वेगवेगळ्या स्वरूपाचे नवसही बोलतात नवसपूर्ती झाल्यावर नवस फेडण्यासाठी उरुसाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची बाबांच्या दर्ग्यामध्ये रेलचेल असते.
अरबस्तानातून सुफी संतांचा प्रसार करण्यासाठी चार चिस्ती संत भारतात आले पैकी ख्वाजा शाहमन्सूर आरिफ हे इ .स.१३८० मध्ये सुपे येथे आले. ख्वाजा शाहमन्सूर आरिफ रहेमतुल्ला अलैय हे त्यांचे संपूर्ण नाव . दक्षिण भारतामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यात सामंजस्य निर्माण होऊन बंधुभाव जागृत व्हावा ,सर्व माणसे ही एकाच देवाची लेकरे आहेत मग आपणच का दुजाभाव निर्माण करायचा ,कशाला जातीधर्माच्या भिंती निर्माण करायच्या अशा महान कार्याचा वसा घेऊन ते येथे आले.
ख्वाजा शाहमन्सूर हे सर्वप्रथम सुपे गावापासून वायव्य दिशेला छपन्नमेरू पर्वतरांगेमध्ये तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विजोळे नावाच्या दरीत प्रथम आले.यावेळी सुपे गावात भूत, पिशाच्च, डाकिनीचे साम्राज्य होते .दुष्ट शक्तीचे प्राबल्य गावावर असल्यामुळे सर्व लोक हैराण झाले होते एके दिवशी भल्या पहाटे बाबांनी नमाज पठण करून अजान (बांग)दिली.त्यावेळी या गावातील भूत,पिशाच्च,डाकिनी घाबरून परागंदा झाल्या.बाबांच्या अदभूत ,अचाट शक्तीची महती लोकांना पटली .बाबांच्या रूपाने कोणीतरी अवलिया आल्याचे समजून त्यांच्या दर्शनासाठी लोकांनी विजोळे येथे गर्दी केली .काही दिवस तेथे वास्तव्य केल्यानंतर लोकांनी आग्रहाखातर बाबांना सध्या असणाऱ्या दर्ग्याच्या ठिकाणी वाजत गाजत आणले हिंदू मुस्लिम ही एकाच देवाची लेकरे आहेत.राम-रहीम एकच आहेत ही बंधुभावाची शिकवण देऊन ती लोकांच्या गळी उतरविली .मजहब नहीं सिखाता, आपसमे बैर रखना ! याप्रमाणे लोकांनीही प्रेरित होऊन ही शिकवण शेकडो वर्षांपासून आजतागायत अबाधित ठेवली आहे.
राज्यात जातीधर्माच्या नावाखाली जाळपोळ,दंगली उसळत असताना यामध्ये अनेक निरापराधांचा बळी जात असताना, मानवता पायदळी तुडवली जात असताना मात्र सुपे गावाच्या वेशीत या विषारी वातावरणाची साधी झुळूक सुद्धा दृष्टीस पडत नाही खऱ्या अर्थाने बाबांनी सुप्याच्या मातीत एकतेचे समतेचे जे बीज रुजवले आहे त्याचे फलीतच मानावे लागेल.
रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव हिंदूंना शीरखुर्मा खाण्यासाठी निमंत्रण देतात व दिवाळीला हिंदू मुस्लीम बांधवांना फराळास बोलावतात.या महिन्यातील इफ्तार पार्टीसाठी हिंदूंचाही सहभाग असतो. शाहमन्सूर बाबा दर्गा संदर्भात सुपे येथील इतिहास अभ्यासक विश्वास देशपांडे यांनी सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना सांगितले की, मुख्य दर्ग्याची इमारत लतीफ शाह यांनी सन १८५१मध्ये बांधली .दर्ग्याच्या दरवाजापाशी उर्दुमध्ये तीन शिलालेख आढळतात. मुख्य दारावर असणारे शिलालेख आज संगमरवराच्या आत झाकले गेले आहेत धर्मशाळेवरील भिंतीवरील दगडावर पर्शियन भाषेत हिजरी १९०८ असा शिलालेख होता .येथील धर्मशाळा वीस फूट लांब,पंधरा फूट रुंद व पंधरा फूट उंच होती.इमारतीवर चारही बाजूला चार मिनार होते.एकतेची ,सर्वधर्म समभावाची रुजवण सुपे गावाच्या मातीमध्ये बाबांनी केली असून ती येथील नागरिकांच्या ह्रदयात वसली आहे.बाबांच्या दर्ग्याच्या उरूस चार दिवस असतो उत्साहाने,आनंदाने सर्वजण यामध्ये सहभागी होत असतात.
------------
लेखक : सुदाम नेवशे हे गेली २० वर्षापेक्षा अधिक काळ विविध वर्तमानपत्रात लिखाण करतात