सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : तरडोली ता. बारामती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत भैरवनाथ विविध विकास सोसायटीच्या चेअरमन शारदा बाळकृष्ण भापकर यांच्या दोन मुलांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुणे येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश करण्यात आला.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बहुतांश विविध सोसायटी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत . पैकी बारामती तालुक्यातील तरडोली येथील भैरवनाथ सोसायटीच्या विद्यमान चेअरमन शारदा बाळकृष्ण भापकर यांच्या राजवर्धन भापकर व हर्षवर्धन भापकर या दोन मुलांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पुणे येथे संपन्न झालेल्या भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत हा जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे, आमदार राहुल कुल , जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे , भिमराव तापकीर, माळेगाव सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन रंजनकाका तावरे , बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे , अनुसुचित जाती जमाती जिल्हा सरचिटणीस रवींद्र साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील भापकर गटाचे ग्रामपंचायत व सोसायटीवर गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्व आहे. भापकर यांच्या भाजप प्रवेशामुळे येथील राजकारणाची गणित वेगळ्या दिशेने फिरणार आहेत. भैरवनाथ सोसायटीच्या चेअरमन शारदा भापकर तसेच हनुमान सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा पुणे जिल्ह्यात अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करणारे बाळकृष्ण भापकरही भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे . तालुक्याच्या पश्चिम भागातील शेत सिंचन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच सक्षम असल्याने हा प्रवेश केला असल्याची माहीती राजवर्धन भापकर यांनी दिली.