एसटी पाससेवा बंदमुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपट : पास काढायला जावे लागते नीरा अथवा माळेगाव

Admin

 सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल येथील बसस्थानकातून देण्यात येणारी विद्यार्थी पासची सुविधा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
            निरा आणि माळेगाव येथील बस स्थानकातून पास दिले जात आहेत मात्र वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे बुद्रुक, होळ आणि सोमेश्वर परीसरातील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी निरा किंवा माळेगाव याठिकाणी जावे लागत आहे. हे अंतर जास्त असल्याने वेळ वाया जात असल्याने सोमेश्वरनगर- करंजेपुल येथे पास ची सुविधा सुरु करावी अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत. बारामतीच्या पश्चिम भागातील निरा-बारामती रस्त्यावरील करंजेपूल हे महत्त्वाचे ठिकाण असून, येथून अनेक विद्यार्थी सोमेश्वरसह  बारामती, शारदानगर, माळेगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेतात. या परिसरातून बारामतीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बारामती आगाराच्या वतीने करंजेपूल येथे नवीन बसस्थानक बांधण्यात आले आहे. मात्र, अपघातात या नविन बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. याठिकाणी पास आणि इतर सुविधा उपलब्ध नसल्याने या परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना निरा, माळेगाव व बारामती येथे पास काढण्यासाठी जावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे; तसेच लांब हेलपाटे मारावे लागत आहेत. काही वेळेला पास संपला तर विद्यालयाला सुट्टी टाकून पास काढण्यासाठी निरा येथे जावे लागत आहे. सोमेश्वरनगर परिसरात नव्याने शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे. याठिकाणी तालुक्याच्या विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करीत असतात त्यांनाही याठिकाणी पास काढता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. बारामती आगाराने येथील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय, मुगटराव काकडे महाविद्यालय, सह्याद्री शैक्षणिक संकुल, विद्या प्रतिष्ठान, सोमेश्वर विज्ञान विद्यालय आदी शैक्षणिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पास सुविधा सुरु झाल्यास याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
......................--------    
आठवड्यातून एक ते दोन दिवस एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करून सोमेश्वर या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थी पासची सोय उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती एसटीचे पुणे विभागीय नियंत्रण रमाकांत गायकवाड यांनी दिली. 
To Top