वाई ! अतिवृष्टी झालेल्या कवठे गावात वाईचे तहसीलदार रणजित भोसले दाखल ! नुकसानीची पाहणी करुन दिले पंचनामा करण्याचे आदेश : नागरिकांची गाव बैठक घेऊन जानुन घेतल्या त्यांच्या भावना आणी व्यथा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
कवठे परीसरातील ओझर्डे, बोपेगाव, वहागाव, सुरुर, केंजळ परीसरात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वीजेच्या गडगडाटासह ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाउस झाला. अचानक आलेल्या पावसाने शेत शिवारात पाणी तुडूंब साठले. तसेच अनेक ठिकाणी शेतातून पाण्याचे लोट वाहत असल्याने खरीपातील सोयाबीन, घेवडा तसेच इतर कडधान्य पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
 
        गेली दोन तीन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे हवेत कमालीचा उकाडा जाणवत होता. गेली दोन दिवसांपासून ढगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसाने काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. जवळपास तासभर झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. विशेषतः खरीपातील सोयाबीन, घेवडा तसेच कडधान्याच्या पिकांमध्ये पावसाचे पाणी साठून राहीले होते. तसेच काही ठिकाणी शेतातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या लोटाबरोबर बांध फुटून माती व पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कवठे परीसरात गेली दोन दिवसांपासून वीजेच्या गडगडाटासह मुसळधार पाउस झाला. त्यामुळे डोंगरभागाकडून ओढे नाले तसेच शेतातील साठलेले पाणी फुटून गावात व वाडीवस्त्यावरील जवळपास दिडशेहून अधिक घरात शिरले. त्यामुळे नागरीकांचे संसारोपयोगी साहीत्य व अन्नधान्य भिजून मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यात साप, खेकडे घरामध्ये शिरु लागल्याने अनेक नागरीक घाबरून सुरक्षितस्थळी गेले.
या दोन दिवसातील पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता तहसिलदार रणजित भोसले, कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सर्कल अधिकारी गायकवाड, तलाठी सुशील राठोड, ग्रामसेवक भोसले आदी प्रशासकीय अधिकारी आले होते. 
तहसिलदार रणजित भोसले यांनी याबाबत प्राधिकरणाशी योग्य ती चर्चा करुन तोडगा काढण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली. गावातील व शेत शिवारातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत उपस्थित महसूल व कृषी अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
 
पाणी साठल्याने नागरीक गावाबाहेर
महामार्गावरील सुरुर, कवठे येथील भुयारी मार्गात पाणी तुंबून राहील्याने शालेय विद्यार्थी, महिला तसेच नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जवळपास सहा ते सात फूटांपर्यंत पाणी साठल्याने दोन्ही ठिकाणची वाहतूक बंद पडली. शाळा सुटल्यानंतर तासभर विद्यार्थ्यांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी धोकादायकपणे सहापदरी महामार्ग ओलांडावा लागला. तर अनेक दुचाकी व चारचाकी वाहने गावाबाहेरच अडकून पडली. या दोन्ही भुयारी मार्गात पाणी वाहवून जाण्यासाठी अतिशय तकलादू व्यवस्था केली असून, त्यातून पाणी वाहून जात नसल्याने वारंवार पाणी तुंबते. महामार्ग प्राधिकरणाच्या तकलादू काम व अक्षम्य दुर्लक्षपणामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या दोन्ही ठिकाणी पाणी वाहवून जाण्यासाठी पुरेसी व्यवस्था करावी अशी मागणी कवठेकर नागरीकांनी केली.
To Top