सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सिद्धटेक : प्रतिनिधी
सिद्धटेक येथे सुरू असलेल्या कर्मचारी आंदोलनाबाबत सर्वप्रथम सोमेश्वर रिपोर्टरने वृत्त देऊन या विषयाला जागृती निर्माण केली. यानंतर अहमदनगर व पुणे जिल्हा यासह इलेक्ट्रॉनिक मीडियाने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची दखल घेतली.
अष्टविनायकातील ‘सिद्धटेक’ मंदिरात सलग पाच दिवस सुरू असलेले कर्मचारी काम बंद आंदोलन काल ता.३० जुलै २०२२ रोजी तात्पुरते थांबवण्यात आलय. कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत विश्वस्त मंडळाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले. येणाऱ्या पुढील 13 ऑगस्ट पर्यंत कर्मचाऱ्यांनी विश्वस्त मंडळाला अल्टिमेटम दिला आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट या संस्थेत प्रथमच सिद्धटेक येथे कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन व्यवस्थापनाच्या विरुद्ध आवाज उठवला. अनपेक्षित दोन कर्मचाऱ्यांच्या चिंचवड येथे बदली केल्याने या आंदोलनाला सुरुवात झाली. यापूर्वी गेली अनेक वर्ष कर्मचाऱ्यांना कमी पगार असल्याने पगार वाढ व्हावी अशी मागणी होत होती.
परंतु व्यवस्थापनाच्या दबावामुळे याविरुद्ध कुणीही आवाज उठवत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला. यासाठी सर्वप्रथम येथील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. उशिरा का ? होईना परंतु या आंदोलनामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्ट मधील हा प्रलंबित प्रश्न जनतेसमोर आला.
सिद्धटेक मंदिरात दि.२६ जुलैपासून कर्मचाऱ्यांनी सामूहिक काम बंद आंदोलन सुरू केले या आंदोलनाची मीडियाने सकारात्मक दखल घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय चर्चेला आला. तब्बल पाच दिवस शांतता व संयमाने 35 कर्मचारी मंदिराच्या सभामंडपात बसून होते. आंदोलनादरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण दक्षता घेण्यात आली.
कर्मचारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी रात्री उशिरा चिंचवड देवस्थान ट्रस्ट मधील दोन विश्वस्त संपूर्ण विश्वस्त मंडळाची विचार विनिमय करून तोडगा काढण्यासाठी सिद्धटेक येथे प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील काही प्रमुख कार्यकर्ते देवस्थान ट्रस्ट स्थानिक मानकरी चिंचवड देवस्थान ट्रस्ट कर्मचाऱ्यांच्या वतीने तीन कर्मचारी प्रतिनिधी, पोलीस पाटील यांनी या आंदोलनात निर्णायक भूमिका घेतली.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ यांची येणाऱ्या दि.१३ ऑगस्ट रोजी बैठकीत पगार वाढ व अन्य मागण्यांबाबत निर्णय होणार आहे. यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.