सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांनी 'अजितदादा उद्यान' अंतर्गत खडकाळ माळरानावर चारशे विविध प्रकारच्या झाडांची 'सोमेश्वर देवराई' फुलवली आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलामध्ये संचालक ऋषी गायकवाड यांच्या संकल्पनेतून अजित दादा उद्याना अंतर्गत 'सोमेश्वर देवराई' या अनोख्या प्रकारच्या वृक्ष लागवडीची योजना राबविण्यात आली. यासाठी सोमेश्वर कारखान्याने एक एकर जमीन उपलब्ध करून दिली असून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी झाडांसाठी ठिबक दिले आहे.
या स्थापन केलेल्या देवराई मध्ये एकूण १०० प्रकारची प्रत्येकी ४ झाडे अशी एकूण ४०० झाडे लावण्यात आली. या १०० प्रकारामध्ये देशी वृक्ष काही नक्षत्र वृक्ष व इतर औषधी वृक्ष यांची लागवड केल्यामुळे या झाडांचा निसर्गाला उपयोग होईलच तसेच शैक्षणिक संकुलामध्ये शिकणाऱ्या व इतर वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना इतक्या विविध प्रकारची झाडे एकाच ठिकाणी पाहायला मिळतील व या उद्यानच स्थानिक ग्रामस्थांना सुद्धा फायदा होणार आहे.
तसेच या उद्यानामध्ये वैविध्य पूर्ण असे गोरख चिंचेचे (Adansonia digitata) झाड लावण्यात आले आहे विशेष म्हणजे याचे किमान आयुर्मान २००० वर्षांपेक्षा अधिक काळ असते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सध्या भारतात कर्नाटक मध्ये असलेल्या या प्रकारच्या झाडाचे वय हे १५०० वर्ष एवढे आहे.
काल अजित पवार यांना गोरख चिंचेचे झाड देऊन सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने सत्कार केला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, सुनील भगत, शैलेश रासकर, संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, प्रणिता खोमणे, शिवाजीराजे निंबाळकर, अजय कदम, अनंत तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------
उद्यानामध्ये लावलेल्या झाडांची माहिती खालीलप्रमाणे:
फूल झाडे : ताम्हण, कांचन, बहावा, पांगारा, काटेसवार, मारखामिया, कुंदा, कुडा, कामिनी इत्यादि.
फळ झाडे : आंबा, चिकू, जांभूळ, आवळा, चेरी, पेरू, कवठ, बोर, करवंद, फणस, काजू इत्यादि.
देशी महत्वाची झाडे : आपटा, मेशिंगी, मोह, कडूनिंब, लिंबारा, भेंडीच झाड, शिवण, हिवर, मुचकून्द इत्यादि.
इतर झाडे : महोगणी, वड, पिंपळ, उंबर, पिपरण, चुक्रासिया, वारंग इत्यादि..