सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर-कापूरव्होळ मार्गावरील नेकलेस पॉईंटजवळ इंगवली ता.भोर गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह शनिवार ता.27 दुपारी आढळून आला आहे. किकवी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार इंगवली गावचे पोलिस पाटील गणेश कांबळे यांनी राजगड पोलिसांना याबाबत खबर दिली. घटनेची माहिती मिळताच किकवी दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक नितीन खामगळ, हवालदार दिनेश गुंडगे, गणेश लडकत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत महिलेचे वय अंदाजे ६० वर्षे असून अंगावर लाल रंगाचा ब्लाऊज आणि काळ्या रंगाचा परकर घातलेला आहे. कानात कर्नफुले आणि हातात बांगड्या आहेत. मृतदेह २४ तासांपेक्षा जास्त वेळ पाण्यात राहिलेला असावा. संबंधीत मयत झालेली महिला नेकलेस पॉईंटजवळ पाय घसरून पाण्यात पडली असावी किंवा नीरा नदीच्या पुलावरून पाण्यात पडली असावी. असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत कोणाला माहिती असल्यास राजगड पोलिस ठाण्याशी (क्रमांक 02113-272233) संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले. पोलिस हवालदार गणेश लडकत पुढील तपास करीत आहेत.