सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
अंशदायी पेन्शन योजना बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वाई तालुक्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत बाईक रॅली काढली. हातात फलक असलेले कर्मचारी रॅलीत सहभागी होते.
एमआयडीसीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून सुरू झालेली रॅली पंचायत समिती, नगरपालिका,पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयांसमोरून तहसील कार्यालयावर पोहोचली. यावेळी रॅलीत सहभागी कर्मचाऱ्यांनी रॅलीची सांगता करताना अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या बैठका होऊनसुद्धा साडेतीन वर्षात कोणताही निर्णय झाला नसल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सेनादल,खासदार,आमदार यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे, मात्र कर्मचाऱ्यांना ती लागू केली जात नाही.अंशदान म्हणून जमा झालेल्या रकमेचा हिशेब ठेवला जात नाही,शासन विविध संवर्गात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे,आदी आरोप यावेळी करण्यात आले.शासनाच्या संभाव्य पेन्शन योजनेच्या लाभाचे स्वरूप शाश्वती देणारे नाही,फंड मॅनेजरला पेन्शन रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अधिकार दिले आहेत,या बाबींकडे मनोज पवार,विठ्ठल माने,उषा गायकवाड,दीपक कासवेद व कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले.नवनाथ शिंदे यांनी घोषणा दिल्या.
कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांना निवेदन दिले.रॅलीत ग्रामसेवक संघटनेचे किरण निकम,प्राथमिक शिक्षक समितीचे अनिल पिसाळ, यादवराव शिंदे,प्रशांत पवार, अमर वाघ,नितीन फरांदे,सचिन राठोड,रुपेश शिंदे,सुरेखा कुंभार, सचिन गोंधळी,पल्लवी भोसले, शुक्ला भिलारे,मंगेश डंबेलकर, पांडुरंग भोसले,अमोल जगताप, अरुण पदमेरे,शीला पिसाळ, रूपाली निंबाळकर,उमेश जाधव,विजय साठे आदी कर्मचारी सहभागी झाले होते. नरेंद्र सणस यांनी प्रास्ताविक केले.शिरसाट यांनी आभार मानले.