सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील भाटघर धरण जलाशयाशेजारील नऱ्हे ता. भोर येथील यशवंत व्हीला बंगल्याच्या लगत पूर्व बाजूने ग्रामपंचायतकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता अनेक दिवसांपासून यशवंत व्हीला बंगल्याच्या मालकाने हरकत दिल्याने बंद होता.रस्ता बंद असल्याने गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने ग्रामस्थ व महिला यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.मात्र तहसीलदार सचिन पाटील ,राजगड पोलीस निरीक्षक सचिन पाटील,ग्रामस्थ,महीला तसेच वैयक्तिक मालक यांनी संयुक्तिक चर्चा करून रस्ता गुरुवार दि.१ रात्री उशिरा खुला केला.
जिल्हा परिषद मुख्य रस्त्यापासून यशवंत व्हीला बंगल्याच्या लगत पूर्व बाजूने ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टाकलेला मुरूम जेसीबीने उकरून वहिवाटीचा रस्ता खड्डे पाडून वहिवाटीस अडथळा होईल अशा पद्धतीने उकरल्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.सदर रस्त्याची पाहणी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनी गावातील सरपंच,उपसरपंच, महिलावर्ग, ग्रामस्थ तसेच वैयक्तिक मालक यांच्या उपस्थितीत न्यायालयीन प्रक्रिये बाबतचा पूर्व इतिहास जाणून घेतला सदर रस्त्याबाबत जिल्हा न्यायालयात रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींच्या पूर्वहक्कावर यांनी केलेला दावा मे. न्यायालयाने फेटाळला असले बाबत न्यायालयीन निर्णयाची प्रत ग्रामपंचायतीमार्फत सादर करण्यात आली व रस्ता पूर्ववत करण्यात बाबत मागणी केली.याबाबत रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणारी व्यक्ती यशवंत व्हीला बंगल्याचे मालक यांच्याशी चर्चा केली असता जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सद्यस्थितीत कोणत्याही वरिष्ठ न्यायालयात दावा प्रलंबित नसल्याचे सांगितले.तदनंतर चर्चेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रस्ता पूर्ववत खुला करण्यात आला.यावेळी महिला ,ग्रामस्थ ,ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य ,तलाठी ,ग्रामसेवक उपस्थित होते.