सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
राज्यभरात लंपी आजाराने थैमान घातले असून यामध्ये अनेक जनावरांना लम्पिची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बैलगाडा शर्यत व जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील सुप्रसिद्ध जनावरे बाजार राज्यात वाढत असलेल्या लम्पी त्वचा रोगाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सध्या राज्यात जनावरांच्या लम्पी या आजाराने थैमान घातलेय. लोणंद परिसरातील खंडाळा आणि फलटण तालुक्यातील काही भागांत लम्पीने ग्रस्त जनावरे आढळून आलेली आहेत. तसेच लोणंद बाजारात पुणे, सातारा ,सांगली ,सोलापूर, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातूनही जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारी येत असतात. लम्पीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार सातारा जिल्हाअधिकारी आणि खंडाळा तहसिलदार यांच्या सूचनेनुसार गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर पासून पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी लोणंद बाजार आवारावरील जनावरे व शेळी मेंढी बाजार बंद राहणार असून या आदेशाची सर्व शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.