सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पुरंदर व बारामती तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेली शेतकर्यांसाठीची नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेस सुरवात झाली आहे. २७ सप्टेंबरपासून मतदार यादीचे काम सुरू होणार असून २९ जानेवारीला मतदान, तर ३० ला मतमोजणी होईल.
ही बाजार समिती २ तालुक्यातील मिळून असल्याने याचे मुख्य कार्यालय नीरा तर उप कर्यालय सासवड या ठिकाणी असूनही बारामती व पुरंदर या दोन्ही तालुक्याची सत्ता केंद्र आहेत. तर गेले अनेक वर्ष या बाजार समितीवर शेतकरी कृती समिती (काकडे गट), राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीचे आता बिगुल वाजले असून शिवसेने (शिंदे गट) व भाजप कडून देखील उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रखडलेल्या निवडणुकीसाठी दोन वर्षानंतर पुन्हा दुसऱ्यांदा बिगुल वाजला आहे. २७ सप्टेंबरपासून मतदार यादीचे काम सुरू होईल. २३ ते २९ डिसेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. ३० डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी, २ जानेवारी छाननी आणि नंतर वैद्य नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी करणे ०२ ते १६ जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे. १७ जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप करणे, २९ जानेवारीला मतदान, तर ३० ला मतमोजणी होईल.
पुरंदर तालुक्यातील १०० बारामती तालुक्यातील ३२ गावांचे कार्यक्षेत्र आहे. गेले अनेक वर्ष अडचणीत असणारी बाजार समिती मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात काही अंशी फायद्यात असल्याचे पाहावयास मिळते. गूळ, धन्याचा व्यापार व पेट्रोल पंप हा बाजार समितीचा कणा असल्याने कर्मचाऱ्यांना आता पगाराची प्रतीक्षा करावी लागत नाही.
वर्षभरापूर्वी देखील निवडणुकीचा बिगुल वाजला होता. प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध झाली होती. पण, शासनाने ही निवडणूक पुन्हा पुढे ढकलली. येथील बाजार समितीची मागील निवडणूक १३ सप्टेंबर २०१५ रोजी झाली होती, ऑगस्ट २०२१ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. कोरोनामुळे ही निवडणूक रेंगाळली होती. निवडणूक बाजार समितीच्या पारंपरिक पद्धतीनेच होईल. कार्यक्षेत्रातील सेवा संस्था, ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्याचबरोबर बाजार समितीचे घटक असणारे नोंदणीकृत व्यापारी, अडते आणि हमालांचे प्रतिनिधी देखील निवडले जातील.
विविध कार्यकारी सेवा संस्था गटातून सर्वाधिक ११ संचालक निवडले जातील. त्या पाठोपाठ ग्रामपंचायत गटातून ४ संचालक आहेत. व्यापारी, अडते गटातून २, तर हमाल मापाडी गटातून १ प्रतिनिधी निवडला जाईल. एकूण १८ संचालक निवडले जातील.
सर्वाधिक विविध कार्यकारी सेवा संस्थांचे ११ सदस्य निवडले जाणार असून यासाठी बारामती तालुक्यातील ८२० व पुरंदर तालुक्यातील १,१५० मतदार असतील तर अंदाजे पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे २५० शिवसेनेकडे १७५ भाजपकडे ५० तर काँग्रेसकडे ७०० तर बारामतीतील ८२० मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सेवा सोसायटी मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असल्याचे देखील चर्चा पुरंदर मध्ये रंगत आहेत.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीने निवणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांना सन्मानजनक जागा न मिळाल्याने निवडणुक लागली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
-----------------
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने पुरंदर व बारामतीच्या पश्चिम भागातील राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी विरोधात शिवसेना शिंदे गट व भाजप समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
--------------
१९५६ साली सहकारमहर्षी मुगुटअप्पा काकडे यांनी स्थापन केलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर सलग चाळीस वर्षे काकडे कुटुंबाची एक हाती सत्ता होती. त्यामध्ये सर्वांत जास्त काळ श्यामकाका काकडे सभापती म्हणून विराजमान होते. आज दोन्ही तालुक्यांतील कितीही पक्ष असले, तरी शेतकरी कृती समितीची (काकडे कुटुंबाची) भूमिका निर्णायक ठरणार आहे.