सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
दुर्गम डोंगरी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक भोर नगरपालिकेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे यांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतल्याने भोर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तालुक्याच्या दौऱ्यावर असताना शहरातील भोर नगरपालिकेच्या शाळा क्र.१ च्या दुरावस्थेची पाहणी केल्यानंतर खासदार सुळे यांनी अचानक आपला मोर्चा नगराध्यक्ष निर्मला आवारे यांच्या घराकडे वळवला आणि त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष यांच्या घरी सुळे यांचा कार्यकर्त्यांसमवेत चहापानाचा कार्यक्रम झाला.यावेळी माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, माझी जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड,माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी नगरसेवक यशवंत डाळ ,शहराध्यक्ष नितीन धारणे,शहराध्यक्षा हसीना शेख आदींसह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------
मतदार संघातील नगराध्यक्षा असल्याने प्रेमाची भेट
भोर शहराच्या नगराध्यक्ष या माझ्या मतदारसंघातील असल्याने त्यांची प्रेमाची भेट घेण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
----------------------
भेटीतून राजकीय चर्चांना उधाण
मागील एक महिन्यांपासून नगराध्यक्षा काँग्रेस पक्षाच्या काही कार्यक्रमांना गैरहजर असल्याने नगराध्यक्षा नाराज असल्याची चर्चा भोर शहरात होती.या गोष्टी ताज्या असतानाच काँग्रेसच्या नाराज असलेल्या नगराध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांची प्रेमाची भेट झाल्याने भोरच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे तर या भेटीतून काही वेगळे घडेल का अशी आशा भोर वासियांना लागल्या आहेत.