सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
भारत विकास परिषदेच्या वाई शाखेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत हिंदी विभागात सेंट थॉमस स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. कन्याशाळा व व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर संस्कृत विभागात कन्याशाळा वाईने प्रथम, सेंट थॉमस स्कूल व व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई कन्याशाळेतील सत्यव्रती जोशी सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यालयांसोबत रमेश गरवारे स्कूल, सनराईज स्कूल, जॉय चिल्ड्रन्स अॅकॅडमी, त.ज. जोशी विद्यालय आणि दिशा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी सेंट थॉमस स्कूलची प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे संयोजकांनी सांगितले.
मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अध्यक्षीय मनोगतात बोलताना मुग्धा वैद्य म्हणाल्या, विद्यार्थीदशेतच मुलामुलींवर देशभक्तीचे संस्कार रुजविणे फार महत्त्वाचे आहे. गंगा, गीता, गोमाता, आई आणि भारतमाता यांना कधीही विसरता कामा नये. क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी स्मारकांना विद्यार्थ्यांनी भेट दिली पाहिजे. प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा अतिवापर याबाबत जनजागृती केली पाहिजे.
प्रांत अध्यक्षा सीए प्रविणा ओसवाल म्हणाल्या, दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. पुढील वर्षी यामध्ये लोकगीतांचाही समावेश केला जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये संपन्न होणार्या ‘भारत को जानो’ या स्पर्धेतही वाईतील शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. भारत विकास परिषदेच्यावतीने सामूहिक विवाह, मोफत उपचार, रक्तदान, नेत्रचिकित्सा शिबिरे, वृक्षारोपन आदी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय समूह गान स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम भारत विकास परिषदेच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी परीक्षकांच्यावतीने सौ.पूजा कोहळे, सौ.भारती देशमुख, सौ.ज्योत्स्ना सोहोनी, सौ.मनिषा घैसास आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. रुपाली कदम यांनी तर आभार प्रदर्शन मकरंद मुळे सर यांनी केले. स्पर्धेच्या संयोजनासाठी भारत विकास परिषदेचे वाई शाखा अध्यक्ष डॉ. सौ. वृषाली फरांदे, सचिव सौ चित्रा शिंदे , खजिनदार सौ अंजली मांढरे , श्री. अजय गोळे, सौ. शोभा करंजे, अरविंद बोपर्डीकर, भरत गांधी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास वाई अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अरुण देव, विद्यमान संचालक सेवानिवृत्त न्यायाधिश प्रताप शिंदे, डॉ. शेखर कांबळे आदींसह विविध शाळांचे संगीत शिक्षक, वादक उपस्थित होते.