सुपे परगणा ! धर्माची बंधने तोडून माणुसकीची भिंत जोडणारी दिवाळी : सुप्याच्या विद्या प्रतिष्ठानकडून उपक्रम

Admin
 
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
सुपे येथील विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने आयोजित 'एक दिवा, एक लाडू, माणुसकीची भिंत जोडू' या उपक्रमांतर्गत गरीब मजुरांच्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्यात आली.          
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सुट्टीला जाण्यापूर्वी या उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी स्वेच्छेने कोणतीही मदत या गरीब कुटुंबांकरिता करावी असे आवाहन शाळेकडून करण्यात आले होते. यामध्ये छोट्यात छोटी मदत म्हणून एक दिवा, एक लाडू अथवा दिवाळीला उपयुक्त कोणतीही एक वस्तू शाळेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.           
           यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी साखर, डाळ, गरा, खसखस, चिवड्यासाठीचे चुरमुरे, कपडे, साबण, उटणे, अगरबत्ती इत्यादी छोट्या छोट्या वस्तु देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.   सुप्यात फुल विक्री करणारे आमिन आत्तार यांनी माणुसकी संभाळत गरीब मजुरांच्या कुटुंबाकरिता तब्बल २० साड्या दिल्या, तर आरिफ शेख यांनी लहान मुलांचे सहा ड्रेस दिले. समीर गदादे या पालकांनी २० ब्लँकेट मदत म्हणून दिले.        धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुमारे १०० ते १५० गरिबांची दिवाळी गोड व्हावी या भावनेतून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी केलेली मदत खऱ्याअर्थाने माणुसकीची भिंत जोडणारी ठरली.     
 तसेच अनेक विद्यार्थी व पालकांनी आपापल्या परिने काही पणत्या, दिवे भेट दिले. विद्या प्रतिष्ठानच्या सर्व शिक्षकांनी एकत्रित येत आकाश कंदील व पणत्या या गरीब कुटुंबांना भेट म्हणून दिल्या.         ..................................... 
To Top