सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार दि ७ रोजी नांदगाव ता.भोर येथील एका गर्भवती महिलेस प्रस्तुती करिता दाखल करण्यात आले होते. या महिलेची प्रसुती करताना डॉक्टर व दोन आरोग्य सेविका यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
संबंधित डॉक्टर व आरोग्य सेविका यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले व नातेवाईक यांच्याकडून होत आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात शासकीय आरोग्य सेवा उत्तम प्रकारे मिळत असल्याने तालुक्यातील दुर्गम-डोंगरी भागातील नागरिक उपचारासाठी कायमच गर्दी करत असतात.मात्र सध्या घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जायचे की नाही असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.मागील आठवड्यापूर्वीही याच उपजिल्हा रुग्णालयामध्ये अपंगांसाठी शिबिर भरवण्यात आले होते. मात्र या शिबिरासाठी आलेले डॉक्टर यांनी मद्य पील्याने हे शिबिर रद्द करण्यात आले.यामुळे शेकडो मैलावरून आलेल्या अनेक अपंग लोकांना उपचार न घेताच परतावे लागले होते.या दोन घटनांमुळे उपजिल्हा रुग्णालय भोरच्या अधिकाऱ्यांचे व्यवस्थापनात हलगर्जीपणा होत असल्याचे समोर येत आहे.