सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
दसऱ्याच्या सणाला अवघे दोन दिवस बाकी असताना या शुभ मुहूर्तावर झेंडूच्या फुलांचा प्रतिकिलो शंभर रुपये दर झाल्याने झेंडूचा बाजारभाव भोर तालुक्यात शंभराच्या घरात पोहोचला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
तालुक्यात यंदा झेंडूच्या झाडांची लागण केल्यानंतर काही दिवसांनी अतिवृष्टी झाल्याने तसेच रोगट हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचे झेंडूचे फड खराब झाले होते.त्यामुळे सध्या तालुक्यात मोजक्याच झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे झेंडूचे मळे पहावयास मिळत आहेत.गणेशोत्सव काळात शेतकऱ्यांना अतिपावसाचा फटका बसल्याने झेंडू फुलबागा खराब होऊन गेले होत्या. पावसाने झेंडूची फुले भिजून गेल्याने मनासारखा फुलांना बाजारभाव मिळाला नव्हता.सध्या दिवसांपूर्वी ६० ते ७० रुपये प्रतिकिलो फुलांचा भाव चालू होता.मात्र सोमवार दि. ३ फुलांचा भाव १०० रुपये प्रतिकिलो झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यात फुलबागा कमी प्रमाणात असल्याने अजूनही दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.तर बाहेरील तालुक्यातून तसेच पुणे येथील मार्केटमधून व्यापाऱ्यांनी खरेदी करून भोर येथे विक्रीसाठी आणल्यास स्थानिक शेतकऱ्यांच्या फुलांचा बाजार कमी होणार असल्याने फटका बसणार असल्याचे चित्र आहे.