सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी नॅक, बेंगलोर पुरस्कृत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे उच्चशिक्षण संस्थांमध्ये होणारे परिवर्तन’ या विषयावर हे चर्चासत्र होणार असून कार्यक्रमाचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. (डॉ.) नीतीन करमळकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
पहिल्या सत्रात नॅक बेंगलोरचे सल्लागार डॉ. देवेंद्र कावडे यांचे बीजभाषण होणार असून, नवीन उच्च शिक्षण धोरणावर ते प्रकाशझोत टाकणार आहेत. दुपारच्या सत्रांमध्ये तज्ज्ञ अभ्यासकांचे पॅनल डिस्कशन होणार असून, त्यानंतर सहभागी अभ्यासक आपल्या संशोधन पेपरचे सादरीकरण करणार आहेत.
समारोपाच्या कार्यक्रमामध्ये जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदरचे चर्चासत्र उच्चशिक्षणाशी संबंधित असल्याने महाविद्यालयीन प्राध्यापक आणि अभ्यासकांनी या चर्चासत्रासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चर्चासत्राचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे, सहसमन्वयक डॉ. बाळकृष्ण मागाडे व निमंत्रक मा. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले आहे.