वाई : एमआयडीसी रस्त्याच्या जागेतील अतिक्रमण न काढल्यास शेतक-यांचा आत्मदहनाचा इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
येथील औद्योगिक वसाहत भूखंड क्र. डी/28-3 या जागेच्या दक्षिण बाजूकडील रस्त्यावर खाजगी मालकाने वाहनाचे शेड, गवताची गंज व झाडे लावून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर शेतरस्त्याचा वापर स्थानिक शेतक-यांना करता येत नाही, त्यामुळे सदरचे अतिक्रमण त्वरीत काढून रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील शेतक-यांनी दिला आहे. 
               याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाई येथील ग्रामीन गट नं. 228 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मास्टर प्लॅनमधील नकाशात 4 मीटरचा रस्ता महामंडळाचे हद्दिपर्यंत ठेवला आहे. मात्र संबंधित अधिका-यांनी रस्ता दाखवूनही सदरचा खाजगी मालक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत आहे. संबंधित ठिकाणी जाणा-या लोकांना सदर कुटुंबिय सामूहिक गुंडगिरीतून दमदाटी व मारहाण करीत असतात. याबाबत अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्या आहेत. मात्र शासकीय दिरंगाईचा गैरफायदा व राजकीय पुढा-यांचा आसरा घेऊन संबंधित खाजगी मालक शेतक-यांच्या हक्काचा रस्ता अडवून ठेवीत आहे. सदर लगतच्या कंपनीमधील कर्मचा-यांना शिवीगाळ करणे, आजूबाजूच्या शेतक-यांना, ऊस तोडणी कामगारांना, मेंढपाळांना इकडून रस्ता नाही. असे सांगून त्यांना हाकलवून लावणे, असे प्रकार सबंधित कुटुंब करीत आहे. विरोध करणा-या शेतक-यांना सामूहिक गुडगिरीव्दारे संबंधित कुटुंब मारहाण करीत असते, असे संबंधित शेतक-यांनी सांगितले.
वाई एमआयडीसी अधिका-यांनी सदरचा रस्ता मोकळा करण्यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न केला. परंतु राजकीय दबाबामुळे व संबंधित कुटुंबाच्या अरेरावीमुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र परिसरांतील शेतक-यांनी हा रस्ता त्वरीत मोकळा करून द्यावा, अशी तीव्र मागणी आता लावून धरली आहे. त्यामुळे महसूल विभाग, पोलीस प्रशासन व औद्योगिक महामंडळाला संयुक्त कारवाई करून हा रस्ता मोकळा करावा, अशी शेतक-यांची मागणी आहे. सदर रस्त्याची जागा 1985 साली संपादित झाली असून तेव्हांपासून ही जागा संबंधित खाजगी लोक वापरीत आहेत. 2008 साली गरवारे कंपनीने 2008 साली रस्त्याची 4 मीटर जागा सोडून कंपाऊंड केले आहे. मात्र संबंधित लोक कंपाऊंडच्या कडेचा 4 मीटर रस्त्याची जागाही अडवून ठेवीत आहेत. त्यांना काही गुंड प्रवृत्तीचे लोक सहकार्य करीत आहेत. त्यामुळे सदर रस्त्यावरील अतिक्रमण शासकीय अधिका-यांनी एक महिन्यांच्या आता  त्वरीत काढावे अन्यथा शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा देविदास पेटकर, बाळासाहेब पेटकर, विलास पेटकर, मल्हारी पेटकर, संदीप पेटकर आदी शेतक-यांनी दिला आहे.
To Top