वाई ! हिंदू धर्माला संपविण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही : कालिचरण महाराज

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी 
सर्वधर्म समभावाच्या नावाखाली राजकारण करून, निवडणूकीत मते मिळविण्यासाठी अन्य धर्मियांची पाठराखण करणा-या राज्यकर्त्यांमुळे देशाचे तुकडे होत आहेत. लव जिहाद, लँड जिहाद व साधू संताचे चारित्र्यहनन, बदनामी होत असल्यामुळे हिंदू धर्मावर इतर धर्मीय हल्ले करीत आहेत. हिंदूना संपविण्याची भाषा हिंदूस्थानात तरी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा हिंदू धर्म जागरण महासभेचे कालीचरण महाराज यांनी येथे केले.
             प्रतापगड उत्सव समितीतर्फे वाईतील महागणपती घाटावर आयोजित शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोरक्षक संजयकाका शर्मा (धुळे) यांना ' वीर जीवा महाले ' तर अभिवक्ता रोशन जगताप (कल्याण) यांना ' पंताजीकाका बोकील अभिवक्ता ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सियाचीन सीमेवरील जवान हेमंत तानाजी गाढवे (बोपर्डी) याचाही सन्मान करण्यात आला. तसेच किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी शंकराचार्य पिठाचे राष्ट्रीय सचिव वेदमूर्ती ऋषिकेश वैद्य (वसई), शामजी महाराज, वीर जीवा महाले याच्या वंशज श्रीमती सुमनताई सपकाळ, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज करणसिंह मोहिते, समितीचे उपाध्यक्ष विनायक काका सणस, पंडितदादा मोडक, विराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे सरकार सत्तेत आल्याने प्रतागडावरील अतिक्रमण हटविण्याची उत्सव समितीची मोहिम यशस्वी झाली, असे सांगून कालीचरण महाराज म्हणाले, गडावरील अफजलखान थडग्याच्या परिसरांत पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजातील मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला होता. त्यांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकारण्यासाठी राजनीतीचे हिंदुत्वीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी जात, प्रांत व भाषा विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आपली 'हिंदू व्होट बँक' तयार केली पाहिजे. देशात सर्रास गोहत्या होत आहेत. ओवेसी सारखा नेता हिंदुना संपविण्याची धमकी भाषा करतो, ही धर्माच्या दृष्टीने धोक्याची बाब आहे. पोलिस बंदोबस्त शिवाय आपले उत्सव, सण साजरे होत नाहीत कारण त्वरित दंगे धोपे सुरू होतात. या गोष्टी रोखण्यासाठी पोलिस प्रशासन मजबूर आहे. त्यामुळे श्रद्धा सारख्या हजारो घटना रोज देशात घडत आहेत. आपणच आपल्या देव, धर्म, आणि देश यांचे संरक्षण केले नाही तर नरकात जाऊ. त्यासाठी पारंपरिक रूढी परंपराचे जतन करून धर्माचा दिखावा करा. धर्म प्रचारासाठी समाज माध्यमाचा वापर करून समाज जागृती करा, असेही त्यांनी सांगितले. 
याप्रसंगी ऋषिकेश वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, पंकज शिंदे, प्रथमेश ढोणे, स्वप्निल भिलारे, राहुल पवार, विनायक देवकुळे आदींनी स्वागत केले. श्लोक भोसले याने विजयाताई भोसले यांचे विचार वाचून दाखविले. त्यामध्ये गेल्या 28 वर्षांत अतिक्रमण हटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. तसेच या काळात मदत केलेल्या सर्व कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आनंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. संभाजीनगर येथील शाहिर यशवंत जाधव व सहका-यांनी शिवपोवाडा सादर केला.  शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने समिती व असंख्य कार्यकर्त्यांनी शहरांत फ्लेक्स बोर्ड लावल्याने वाई परिसरांत सर्वत्र शिवमय वातावरण तयार झाले होते.
To Top