सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या एका कंत्राटदारास पन्नास हजाराची खंडणी मागत त्याच्याकडून पस्तीस हजार रूपये जबरदस्तीने घेणाऱ्या दोघांवर लोणंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद येथे राहण्यास असलेल्या पालखी महामार्गाचा कंत्राटदार ललित शिवाजी पाटील वय 34 वर्ष यास सोमवार दि. १२ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कापडगाव ता. फलटण गावच्या हद्दीत रस्त्याच्या चालू कामावर आरोपी सागर शामराव खताळ रा. कापडगाव ता. फलटण आणि सुरज उर्फ बाबा राजेंद्र डोंबाळे रा. लोणंद ता. खंडाळा या दोघांनी चाॅपरने मारण्याची धमकी देत रस्त्याचे काम चालू ठेवायचे असेल तर आम्हास पन्नास हजाराची खंडणी द्यावी लागेल असे धमकावून फिर्यादी जवळील पस्तीस हजार रूपये जबरदस्तीने काढून घेऊन अजून पैसे नाही दिलेस तर तूला मारून टाकीन अशी धमकी दिली.
या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि विशाल वायकर यांनी घटनास्थळावर जावून पाहणी केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार नाळे करीत आहेत.