सोमेश्वरनगर, ता. १
ऊसतोड मजुराचे प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे यासाठी राज्यसरकारने मोहिम सुरू केलेलीच आहे. परंतु सोमेश्वर कारखान्याने पुढाकार घेऊन या मुलांच्या शिक्षणासाठी कोपीवरची शाळा हा अभ्यासवर्ग चालवून अत्यंत उल्लेखनिय काम केले आहे. सर्व कारखान्यांनी अशा प्रकारे शिक्षण विभागास मदत करावी आणि शिक्षक व पर्यवेक्षिय यंत्रणेनेही अशा प्रकारचे काम उभे करण्यास कटीबध्द रहावे. प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी व्यक्त केले.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राज्यातील पहिला 'कोपीवरची शाळा' उपक्रम चालविला जातो. या माध्यमातून मुले फडातून सायंकाळी परतल्यावर सायंकाली पाच ते नऊ या वेळेत शिक्षक-कार्यकर्त्यांकडून अभ्यासवर्ग घेतला जातो. कारखाना कार्यस्थळावर एकूण ३६२ मुले आणि त्यापैकी ६ ते १४ वयोगटाची १६९ मुले आढळली आहेत. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व संचालक मंडळाच्या पाठिंब्यातून मागील वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. या अभ्यासवर्गास बुधवारी रात्री गायकवाड यांनी भेट दिली. शिक्षक-कार्यकर्त्यांचे त्यांनी कामाबद्दल कौतुक केले तर सोमेश्वर काऱखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, शिक्षणसंस्थेचे सचिव भारत खोमणे यांचा त्यांनी या उपक्रमाबाबत सत्कारही केला. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी निलेश धानापुणे, केंद्रप्रमुक नवनाथ ओमासे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी संदीप जगताप, शेती अधिकारी बापूराव गायकवाड, संजय वाबळे, कल्याण जगताप आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रकल्पाचे समन्वयक संतोष शेंडकर यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. अलका रसाळ यांनी आभार मानले.
सुरवातीला जिल्हा परिषद शाळा सोमेश्वरनगर येथे गायकवाड यांनी ऊसतोड मजुरांच्या दोनशे मुलांशी गप्पा मारत त्यांना बोलते केले. मुलांच्या शालेय प्रगतीबाबतही चाचपणी केली. यानंतर त्यांनी स्वतः दिड ते दोन तास मजुरांच्या कोप्यांवर जाऊन पालक व विद्यार्थ्यांशी रात्रीच्या वेळी संवाद साधला. ऊसतोडीसाठी आलेल्या दहावीच्या मोनिका शिंदे, अविनाश पवळ या दोन मुलांशी संवाद साधून त्यांना नजीकच्या विद्यालयात बसविण्याची आणि परिक्षेला मूळ गावी पाठविण्याची सोय केली. नौशाद बागवान घेत असलेल्या अभ्यासवर्गास भेट देऊन मुलांचे अक्षरलेखन, वाचन यातील गती तपासली.
--------------
दरवर्षी सहा महिने शिक्षणात खंड पडत असल्याने मुलांना अभ्यासात गती कमी होते. अभ्यासात कमी पडली की त्यांनाही शाळेत जावेसे वाटत नाही. मूळ गावी उत्तम दर्जाची वसतीगृह होणे हाच पहिला उपाय ठरू शकेल, असे मत संध्या गायकवाड यांनी व्यक्त केले.
-----------------------
'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षांकडून मदत
सोमेश्वरचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी ऊसतोड मजुरांच्या दोनशे मुलांना फोल्डर, कंपास, वही, पेन असे कीट दिले. संचालक ऋषी गायकवाड यांनी खाऊवाटप केले तर शिक्षक दांपत्य अनिल चाचर व रूपाली चाचर यांनी पाचशे वह्या दिल्या. सोमेश्वर कारखान्याचे कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांच्या संकल्पनेतून मुले व मजुरांना कपडे संकलन करून वाटप करण्यात आले. या मदतीचे संध्या गायकवाड यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.