सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संरोष म्हस्के
भोर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या २४ ग्रामपंचायती वगळता ३० ग्रामपंचायतीसाठी रविवार दि.१८ मतदान प्रक्रिया झाली होती.त्याचा निकाल मंगळवार दि.२० जाहीर झाला असून सद्याच्या निवडणुकीतील निवडून आलेले १० तर बिनविरोध मधील २० ग्रामपंचायतींचे सरपंच काँग्रेस पक्षाच्या विचाराचे असल्याने तालुक्यात गावकारभाऱ्यांनी काँग्रेसचा गड राखला आहे.
नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत शांततेत चुरशीने मतदान केले होते.अटीतटीच्या झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर आमदार संग्राम थोपटे यांच्या विचारधारेला मानून काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या उमेदवारांना भरभरून मतदान करीत बहुतांशी काँग्रेसच्या गावकारभाऱ्यांच्या बाजूने कौल दिला. निवडणूक मतमोजणी प्रक्रिया दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व नसरापूर येथील पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ,होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त दिला.