सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कायद्यानुसार सभासदांच्या तुटणाऱ्या उसाला १४ दिवसांच्या आत एफआरपी ची रक्कम अदा करणे हे साखर कारखान्यांना बंधनकारक असते. सोमेश्वर कारखान्याकडून सन २०२१-२२ या सालात जानेवारी अखेर पर्यंत ऊसाचे पैसे देण्यास उशीर झाल्याने कायद्यानुसार सोमेश्वर कारखान्याने नुकतेच सभासदांच्या खात्यावर एफआरपी वरील व्याजाची रक्कम अदा केली असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
राज्यातील बहुतांश कारखाने थकीत एफआरपी वरील व्याज देणेबाबत नाके मुरडत असली तरी 'सोमेश्वर'ने मात्र थकीत एफआरपी वरील व्याज देऊन कौतुकाची थाप घेतली आहे. कदाचित थकीत एफआरपी वरील कायद्यानुसार व्याज देणारा सोमेश्वर कारखाना हा जिल्ह्यात एकमेव ठरला असावा. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत संचालक सुनील भगत व काही संचालकांनी यांनी थकीत व्याज देणेबाबत विषय चर्चेत घेतला होता. याविषयावर सभेत सविस्तर चर्चा होऊन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष प्रणिती खोमणे यांनी गेल्या वर्षीच्या तुटलेल्या तब्बल ९ लाख टन उसाच्या थकीत एफआरपीवरील तब्बेत १ कोटी १० लाख व्याज देण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला.
यावेळी संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, संग्राम सोरटे, अभिजीत काकडे, ऋषिकेश गायकवाड, शिवाजीराव निंबाळकर, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, हरिभाऊ भोंडवे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांचेसह संचालक मंडळ उपस्थित होते.
कारखान्याने चालु गळीत हंगामात आजअखेर ७ लाख ९ हजार ९२२ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी ११.०७ टक्के साखर उतारा राखीत ७ लाख ८३ हजार ८०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत आपल्या कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन आजअखेर ४ कोटी ९१ लाख ५७ हजार १९५ युनिट्सची वीजनिर्मिती केली असुन २ कोटी ७४ लाख ४० हजार २४४ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून ४१ लाख ७३ हजार ७५३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन सोबत १९ लाख १ हजार ८७२ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. चालू हंगामात आत्तापर्यंत तुटलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रति मे.टन २८०० रुपये प्रमाणे पैसे अदा केले आहेत.