सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
दूध भेसळीसाठी वापरले जाणारे द्रावण बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून पुरवले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
या संदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस हवालदार नवनाथ सावंत पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवार ता. १५ रात्रगस्त करत होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन वाहने त्यांना वाखरी -गुरसाळे बायपास फ्लाय ओव्हर पुलाजवळ संशयित दिसली. त्यांनी या वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये दूध भरण्याचे 19 रिकामे कॅन आणि दुसऱ्या वाहनात निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे 14 कॅन दिसले. निळ्या रंगाच्या कॅन मध्ये पांढर्या रंगाचे लिक्विड भरलेले होते. वाहना जवळ उभा असलेल्या आरोपी निलेश बाळासाहेब भोईटे ( वय 30 रा. रो हाऊस क्रमांक 38, वृंदावनम सोसायटी, टाकळी), पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राचा मालक परमेश्वर सिध्देश्वर काळे ( वय 40 ) आणि वाहनचालक गणेश हनुमंत गाडेकर (वय 25 रा. गणेश नर्सरी जवळ , टाकळी रोड, पंढरपूर) या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी हे द्रावण पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राकडे दूधात भेसळण्याच्या हेतूने घेऊन जात असल्याचे सांगितले. संबंधित आरोपींनी हे द्रावण समीर सुभाष मेहता (रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती) यांच्याकडून आणले असल्याचेही सांगितले.
दूधात भेसळ करण्यासाठी आणलेल्या लिक्विडसह पोलिसांनी छोटा हत्ती ( एम एच सी यु 6628) वाहन आणि मानवी आरोग्यास अपायकारक ठरेल अशा द्रावणाचा सुमारे दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये किंमतीचा साठा पोलिसांनी जप्त केला.
समीर मेहता याच्यावर यापुर्वी दुध भेसळ द्रावण तयार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. दुसऱ्यांदा पुन्हा अशाच प्रकारे लिक्विड पुरवण्याचे निष्पन्न झाल्याने दूध भेसळीचे रॅकेट सुरू असल्याचे सिदध होत आहे.
----------------------------------------