सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील मित्रमेळा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी नववर्ष २०२३ च्या पहिल्या सकाळी नदीस्वच्छता प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. याचा शुभारंभ रिटकवली ता. जावली येथील नदीपरिसरात करण्यात आला.
मित्रमेळा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आजवर विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे "चला जानुया नदीला" या जिल्हास्तरीय कमिटी मध्ये मित्रमेळा फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण पवार यांची निवड करण्यात आली आहे. निसर्गसंवर्धन, वृक्षारोपण, पथनाट्य, आरोग्य शिबीरे अशी विविध कार्य पार पडत असताना या संस्थेच्या माध्यमातून नदी स्वच्छता हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस होणारे नदीचे प्रदूषण हे पर्यावरणासाठी खूप घातक आहे. या प्रदूषणाचा परिणाम मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. नदी प्रदूषित होण्याची प्रमुख कारणे म्हणजे मानवनिर्मित कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो इतरत्र टाकून देणे हेच आहे. परिणामी हाच कचरा ओढे, नाले यांच्या माध्यमातून नदीत येतो व नदी दूषित होते.
नदीकाठी जमा होणारा हाच अविघटनशील कचरा, सिंगल युज प्लॅस्टिक, बॉटल, थर्माकोल, कपडे, चपला उचलून नदी स्वच्छता करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत असते. हा प्रकल्प राबवीत असताना ज्या गावात काम करायचे आहे त्या गावातील लोकांना यात सामील करून घेतले जाते. व त्यांचे प्रबोधन देखील या माध्यमातून केले जाते.
नववर्षाच्या मुहूर्तावर रविवारी सकाळी रिटकवली गावच्या नदीपरिसरात या प्रकल्पाच्या शुभारंभावेळी चोरांबे गावचे सरपंच विजय सपकाळ, उद्योजक अरुण मर्ढेकर, नामदेव मर्ढेकर ,बाळासाहेब मर्ढेकर आदी ग्रामस्थ तसेच मित्रमेळा फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.