सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सत्यम, शिवम, सुंदरम, पंचरत्न महिला बचत गट वाकी यांच्या वतीने शरदचंद्र पवार इंजिनिअरिंग कॉलेज सोमेश्वर नगर या ठिकाणी भव्य महिला मेळावा घेण्यात आला." तू यावं..... बंधन तोडीत यावं" या गाण्यावर ताल धरत महिलांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बचत गटाच्या सचिव वर्षाराणी जगताप यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून बचत गटाच्या व्यवहारांची माहिती दिली. बचत गटाच्या वतीने महिलांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली होती. सोमेश्वर नगर पंचक्रोशीतील जवळपास दीडशे महिला या परीक्षेसाठी बसल्या होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरगाव तालुका कराड च्या सरपंच मनीषा राजेंद्र यादव या होत्या. त्यांनी "महिलांनी मिळालेली संधी अजिबात सोडू नये मग ती राजकारणातली असो नोकरीची असो अथवा सामाजिक जबाबदारीची असो व जास्तीत जास्त वाचन करावे म्हणजे मुलांनाही वाचनाची गोडी राहते" असे सांगितले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲड. स्नेहा भापकर यांनी "सावित्रीबाईंनी त्यांचं कार्य केलं आता पुढे आपली जबाबदारी काय?" या विषयावरती मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी स्नेहा गीते माजी सरपंच होळ, कमलताई पवार संचालिका सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हे उपस्थित होते. सामान्य ज्ञान परीक्षेचे परीक्षक म्हणून होळ, करंजे, सोमेश्वर पब्लिक स्कूल, वानेवाडी व सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज च्या शिक्षकांनी काम पाहिले. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला महिलांचा कार्यक्रम ठरला. अनेक महिलांनी स्वरचित कविता, उखाणे, गाणी सादर केली. उपस्थित महिलांनी वीज निर्मिती व साखर निर्मिती प्रक्रिया समजावून घेण्यासाठी कारखान्याची क्षेत्र भेट घेतली. सामान्य ज्ञान स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे, प्रथम क्रमांकाच्या मानकरी प्रीती राहुल चांदगुडे यांनी पैठणी साडी बक्षिस सर्वोच्च गुण मिळवून पटकवली. द्वितीय क्रमांक प्रियांका राहुल सोनवणे वाकी यांनी प्रेशर कुकर, तृतीय क्रमांक काजल स्वप्निल वायाळ आटफाटा यांनी इस्त्री, चतुर्थ क्रमांक ऐश्वर्या शुभम आळंदीकर डोसा पॅन, पाचवा क्रमांक सुरेखा संजय गायकवाड करंजे यांनी इडली कुकर अशी घसघशीत बक्षिसे जिंकली.प्राजक्ता खटावकर, प्रिया जगताप, वैशाली दरंदले यांनी पर्स हे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. "नेहमीच पाककृती, पुष्परचना, रांगोळी अशा स्पर्धा घेतल्या जातात, प्रथमच अशा प्रकारच्या सामान्य ज्ञान स्पर्धेला बसण्याची संधी मिळाली" अशी भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली. कदम वस्ती बचत गटाच्या वतीने केळी वाटप तसेच कॉलेजच्या वतीने महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता यादव यांनी तर आभार बाळासाहेब जगताप यांनी मानले.