अशीही कृतज्ञता ! निंबुतच्या आगवणे कुटुंबाने दुर्गा खिल्लार गायीचे डोहाळ जेवण घालत केले ओटीभरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजी विष्णू आगवणे व त्यांच्या पत्नी रेखा आगवणे या दाम्पत्याने आपल्या खिलार गाईची चक्क ओटी भरण्याचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला. सातव्या महिन्यात गावातील शंभरपेक्षा अधिक महिलांनी दुर्गा गाईच्या डोहाळे जेवणाला उपस्थिती लावत ओटीभरण केले. आगवणे कुटुंबाच्या दुर्गा गायी विषयी या कृतज्ञता बद्दल परिसरातून कौतुक होत आहे. 
               या वेळी गाईला हार-फुलांनी सजवण्यात आले होते. तसेच तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत गाईची ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी गायला आवडणारे वैरण, मका भुसा, तांदूळ, हरभराडाळ, इत्यादी खाद्य तिच्यापुढे ठेवण्यात आले होते. हा ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी नवीन आगवणे, दीपाली आगवणे व नात हिंदवी आगवणे यांनी मोलाचे सहकार्य केले. या वेळी निंबुत परिसरातील शंभरहून अधिक महिला उपस्थित होत्या. उपस्थित ग्रामस्थांना व महिलांना अल्पोपाहाराचे आयोजन केले होते.
To Top