शिरोळ ! चंद्रकांत भाट ! घराच्या बांधकाम परवान्यासाठी १ लाख ७५ हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह चौघांना अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिरोळ : प्रतिनिधी
घराचा बांधकाम परवाना मंजुरीसाठी १ लाख ७५ हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे (वय 33 मुळगाव  भिलवडी सध्या राहणार शिरोळ ) , कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर (वय 28 सध्या राहणार जयसिंगपूर मुळगाव  उस्मानाबाद) , लिपिक सचिन तुकाराम सावंत (रा शिरोळ) व  खाजगी इसम अमित तानाजी संकपाळ (वय 42 रा शिरोळ) या चौघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी शिरोळ येथील इसमाने तक्रार दाखल केली होती
             यातील तक्रारदार यांनी शिरोळ येथील नंदीवाले वसाहत  रोडवरील बिगर शेती प्लॉटमध्ये घर बांधण्यासाठी बांधकाम परवान्याची मागणी शिरोळ नगरपरिषदेकडे केली होती. बांधकाम परवाना मिळवण्यासाठी संबंधित तक्रारदार हे पालिकेकडे वारंवार हेलपाटे मारत होते. यां- ना- त्या कारणास्तव त्यांना बांधकाम परवाना दिला जात नव्हता. बांधकाम परवाना हवा असेल तर तक्रारदार यांनी मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांना फाईल मंजुरीसाठी ७५ हजार रुपये तसेच बांधकाम परवान्याची फाईल पुढे पाठवण्यासाठी कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर व लिपिक सचिन सावंत यांना एक लाख रुपये द्यावेत. त्यानंतर बांधकाम परवाना देण्यात येईल असे तक्रारदारांस पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत तक्रारदारांनी या घटनाक्रमाची इथंभूत माहती रेकॉर्ड करून लाचेची मागणी केल्याची तक्रार कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  तक्रारीची खातरजमा करून सोमवारी सापळा रचला. तथापि नगरपालिकेची विशेष सभा असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक नगरपालिकेच्या परिसरात थांबले होते. सभा संपल्यानंतर तक्रारदार यांनी नगरपालिकेचे बांधकाम अभियंता संकेत हंगरगेकर व पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्या दालनात जाऊन बांधकाम परवाना मंजुरीबाबत विचारपूस केली.
      बांधकाम परवान्याची फाईल मंजुरीसाठी देण्यात येणारी रक्कम कोणाकडे द्यायचे हे विचारले असता मुख्याधिकारी हराळे व कनिष्ठ अभियंता हंगरगेकर यांनी लिपिक सचिन सावंत यांच्याकडे द्यावेत असे सांगितले. तर सावंत यांनी आपण बाहेर असल्यामुळे सदरची रक्कम खाजगी अमित  संकपाळ यांच्याकडे पैसे देण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी संकपाळ यांच्याकडे ठरलेली एक लाख 75 हजार रुपये रक्कम  दिली. लाच स्वीकारण्याची खात्री झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे  पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने  खाजगी इसम अमित संकपाळ, लिपिक सचिन सावंत, कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर व मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांना लाच स्वीकारल्या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांना अधिक चौकशीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले 
       दरम्यान, या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत  प्रकरणाचे जाब जबाब घेऊन पंचनामा करून रात्री उशिरा शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई
लाच लुचपत विभागाचे वरिष्ठ अधिकारी अमोल तांबे व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर ,पोलीस हवालदार विकास माने, मयूर देसाई ,विष्णू गुरव ,पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने यांच्या पथकाने केली.
------------
To Top