सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीस गेली पाच-सहा दिवसापासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांची लगबग पहावयास मिळत आहे. पिकाच्या काढणीसाठी हरियाणा, पंजाब राज्यातून दाखल झालेली कम्बाईन हार्वेस्टर मशीन्स सध्या जागोजागी दिसून येत आहेत.
इंदापूर तालुक्यात चालू वर्षी गव्हाच्या दरात झालेली वाढ व उपलब्ध असलेला समाधानकारक पाणीसाठा यामुळे गहू पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. पेरणीसाठी बहुतांशी शेतकऱ्यांनी एच.डी.-2189 या खाण्यासाठी चांगला असलेल्या वाणाचा वापर केला आहे. तसेच रब्बी हंगामातील पोषक वातावरणामुळे गहू पिक जोमदार आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पर राज्यातून आलेल्या कम्बाईन हार्वेस्टर मशीनद्वारे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गव्हाचा एकरी उत्पन्न सरासरी 15 क्विंटल येत असल्याची माहिती गहू उत्पादक शेतकरी काशिनाथ अनपट (लाखेवाडी), दीपक रुपनवर (रेडणी) यांनी दिली. कम्बाईन हार्वेस्टर मशीनद्वारे अवघ्या तास- दोन तासात गव्हाची काढणी मळणी होत असल्याने गेल्या दोन दशकांपासून शेतकऱ्यांची त्याच पसंती मिळत आहे.
_____________________________