सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
मागील आठ दिवसांपासून भोर तालुक्यात अचानक तापमानात वाढ झाली आहे.परिणामी रब्बीतील गव्हाच्या पिकावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे गव्हाच्या ओंब्यांमधून दाणे खाली पडू लागले असून तांबेराचाही प्रादुर्भाव वाढला असल्याने उत्पन्नात घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
भोर तालुक्यात यंदा खरिपाच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात आली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात पिकांना पाण्याची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने हातात आलेली पिके वाया गेली होती.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वर्षभर शेतीत राब राब राबूनही शेवटच्या कापणीच्या वेळेस पिके धोक्यात येत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असतो. रब्बी पिकांच्या पेरणी वेळी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गव्हाची पेरणी केली उगवणीच्या काळात चांगली थंडी व पोषक वातावरण असल्याने गव्हाची जोमाने वाढ झाली. सध्या पीक अंतिम टप्प्यात आले आहे.मात्र गहू पिकावर सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे तसेच अचानक अतिउष्णता वाढल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन तांबेरा पडल्याचे चित्र आहे. यामुळे गावाचे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
----––------------------
वाढीव उष्णतेमुळे उत्पन्नात घट होणार
अचानक मागील तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल होत उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.गावाच्या ओंबीतून दाणे बाहेर पडू लागले आहेत. तांबेराचाही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे उत्पन्नात घट होणार असल्याचे खानापूर येथील शेतकरी रामदास नांगरे यांनी सांगितले.