सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
आमचे बारामती तालुक्यातले पश्चीमेवर वसलेले करंजेपुल हे गाव. आमच्या कुटुंबीयानी बारामती सोडल्यावर पन्नास वर्षापासून आम्ही ईथेच स्थायीक झालो .या गावी त्याकाळी आम्ही अगदी पाचवी पासुन दहावी बारावी पर्यंत ची मुले तर कुणी आपल्या शेती व व्यवसायात रमलेली मुले .सगळे एकत्र यायचो .
एक महिनाभर अगोदर पासुन आमची शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी असायची .बाहेरगावी जायचे म्हटले तर आपली ओळख एका नावाने व्हावी म्हणुन आम्ही करंजेपुल च्या सर्व मित्रानी मिळुन "श्रीकृष्णा एकता मंडळ" नावाने एक मंडळ स्थापन केले .बबन दादा चा मनोज गायकवाड, रिठे पाव्हण्याचा सुर्यकांत ,रामा तात्याचा राहुल गायकवाड, मिरची वाल्याचा शंकर (हा शंकर शेलार ) कोरड्याचा अतुल व अविनाश ,सहा फाट्यावरचा बाप्पु गायकवाड,सोनार भावजी चा गणेश, (म्हणजे मी बर का ) बाजीनानाचा राजु , पाटलांचा रमेश ,छबाबाई चा बाप्पु ,काशीनानाचा सुनील ,बोंबीलवाला बाळु ,लवा ,आंका ची जोडी,भंगारवाला आबा ( हे महादेव वाईकर ) ,भंडलकरांचा सुरेश,बुनगे चा राजु ,भोंडवे चा राजु ,जोशी राजु, हाजी भाईंचा फिरोज तसेच आमच्या पथकाच्या झांझपथकाचे नियोजन करणारा अशोक शिंदे अशी वेगवेगळ्या टोपणनावाने कुणी आईच्या नावाने तर कुणी वडीलांच्या नावाने तर कुणाची त्याच्या व्यवसायावरून ओळखली जाणारी आमची मित्रमंडळी...
शिवजयंती च्या उत्सव म्हटले कि आमची एक महिना अगोदर पासुन तयारी असायची. पुरंदर गडापासुन ,सज्जनगड, रायगड ,शिवनेरी अशा गडावरुन आम्ही ज्योत आणायला एक दिवस अगोदरच निघायचो .सोबत कोरडे बंधुचा टेंपो असायचा,ज्यामधे प्रवासात लागणारी स्वयंपाकाची भांडी ,ज्योतीला तेल व एखादा मित्र थकला तर त्याला बसायला जागा असा लवाजमा घेऊन आम्ही आमच्या ज्योत आणायच्या मोहीमेकडे निघायचो.
त्याकाळी ना मोबाईल होता ना डी,जे.चा धमाका होता, मात्र आमच्या कधीच मनाला न लागलेल्या टिंगलटवाळीचा कल्ला जोरात असायचा. ज्योत घेणाराने अजीबात थांबायचे नसते,प्रत्येकाचा पळायचा स्टॅमीना ईतराना माहीत असायचा, .किंबहुना आमच्या मागे टेंपो आला व गणेश बदलायचा का माणुस म्हटले कि आम्हाला अजुन जोश यायचा ..'नाय पळतो सासवड येवुस्तर, अगदी वडकी नाला पासुन अख्खा दिवेघाट चढुन सासवड पर्यंत एकदा मी एकटा पळालेलो ...कुठुन जोश यायचा काय माहीत . .एकदा शिवनेरी वरुन येताना मात्र आमची चांगली फजिती झाली .आम्हाला कॅनॉल वर पोहायची सवय होती, वाहते पाणी असायचे मात्र ज्योत आणताना सर्वजण नदीत पोहायला गेलो... बोंबीलवाला बाळु आमचा स्वयंपाक म्हणजे एक दोन भाजी अन भात वै असे करायची तयारी करत होता.. पळणाऱ्याच्या हातात ज्योत देवुन पुढे टेंपो नेवुन स्वयंपाक सुरु झाला...चांगली भुक लागावी म्हणुन पोहायला नदीत उतरलो . दोन किनारे गाठायचे मी ,सुरेश रिठे व राजु भोंडवे निंम्यापर्यंत गेलो मात्र तिथुन पुढे तेवढेच अंतर.... स्थीर पाण्यात माघारी जावे तरी तेवढेच अंतर... सगळे अवघड झाले तिघांची ही दमछाक झाली .कसे बसे एक पुढे गेला तर आम्ही माघारी निंम्यापेक्षा जास्त अंतर कापले . उलट माघारी न येता पुढे गेल्याचे परवडले असते असे वाटु लागले . पुरेपूर दमछाक झाली ...वाहत्या कॅनॉल सारखे स्थिर पाण्यात पोहणे सोप्पे नसते याची जीवघेणी जाणीव त्यावेळी झाली.
एकदा सासवड जवळ आम्ही ज्योत घेवुन येत होतो ,मगरांचा युवराज ( आण्णा ) दिसला, नुकतीच निघालेली "वायोजर"ही अलिशान लाबलचक भारी गाडी त्यानी घेतली होती .आम्हाला भारी आनंद झाला. आपल्या पुलावरची पोरे बघुन आण्णा ला पण आनंद झाला. मग युवराज आण्णाच्या ओळखीने आम्हाला लगेच तिथे स्वयंपाक करणेसाठी व जेवणासाठी रेस्ट हाऊस उपलबध झाले. जेवण करुन पुन्हा परतीचा प्रवास सुरु झाला .
गावात पोहोचल्यावर करंजेपुल चौकातच गावातील जेष्ठ लोकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन ज्योतीला शिवाजीमहाराजासमोर ठेवुन पुजन केले जायचे . आमच्या सर्वाकडे जेष्ठ लोक पाहुन कोणकोण किती पळले याचे कौतुक व्हायचे. प्रवा सातल्या गमती जमती व्यक्त व्हायच्या.. टेंपोच्या डिझेल साठीची जेवणा खाण्याची व्यवस्था साठी आम्हाला आमच्या वर्गणीशिवाय गावातर्फे पण मदत केली जायची.
आजकालच्या डी.जे. च्या धमाक्यापेक्षा आमचा ढोल ताशांचा धमाका जोरात असायचा पुढे आम्ही झांझपथक केले, ठिकठिकाणी सुपारी घ्यायचो माझ्या लग्नात बीड सारख्या ठिकाणी आमच्या पथकाने अख्या बीड चे लक्ष वेधुन घेतले.
गरीब ,श्रीमंत ,जात- पात ,पक्ष- राजकारण ,आमचा-,तुमचा ... आमच्या वाऱ्याला पण नव्हते आज ही शिवजयंती आली की हे सर्व आठवते आणी मन आठवणींच्या हिंदोळ्यात भरुन जाते. काल नुकताच आमच्या रामतात्याच्या राहुल ने जुना फोटो डायरीतुन काढुन व्हाट्स अप केला अन जुन्या गोष्टीना उजाळा मिळाला. आजच्या आधुनिक सुखसुविधापेक्षा तेच दिवस भारी होते असे पुन्हा पुन्हा वाटु लागते. त्या काळी जपलेल्या तब्येतीमुळे आज देखील आम्ही गड किल्ल्यांचे सौंदर्य अद्याप पाहत आहोत ...इतिहासात वाचलेले कळसूबाई पासुन हरिश्चंद्रगड ,वासोटा ( व्याघ्रगड ),राजगड ,तोरणा गड,कल्याणगड ,रायगड प्रदक्षिणा पासुन करंजेपुल ते कडेपठार पायी वारी असे शक्य होत आहे. महाराजांच्या पाऊलखुणा पाहण्याचे सौभाग्य असेच लाभो हिच सोमेश्वर चरणी प्रार्थना. आजकालच्या नवतरुण रक्तामधे सकारात्मक वाटचालीसह धांगडधिंगा विरहीत शिवजयंती साजरी करण्याची ताकद निर्माण होवो याच सर्वाना शुभेच्छा....
ॲड गणेश आळंदीकर- करंजेपुल
लेखक जेष्ठ पत्रकार तसेच प्रसिद्ध विधिज्ञ आहेत.