बारामती ! 'सोमेश्वर'चे ११ लाख ११ हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन : 'या' महिन्यात पडणार कारखान्याचा 'पट्टा'

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ९ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून आता मात्र  तीन ते साडेतीन लाख टन ऊस उरला आहे. त्यामुळे मार्चअखेर कारखाना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संचालक मंडळाने चालू हंगाम संपेपर्यंत सर्व प्रकारच्या जातीच्या खोडवा उसाच्या नोंदी स्वीकारण्याचा तसेच मार्च महिन्यात रोपपध्दतीची ऊस लागवड करण्यास परवानगी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ९ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप केले. जिल्ह्यात सर्वाधिक ११.४१ टक्के साखर उतारा प्राप्त केला आहे. त्यापाठोपाठ भीमाशंकरचा उतारा ११.४० टक्के आहे. सोमेश्वरमध्ये ११ लाख ११ हजाराव्या साखर पोत्याचे पूजन मंगळवारी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर,  संचालक शिवाजीराजे निंबाळकर, सुनिल भगत, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, अजय कदम, किसन तांबे, प्रवीण कांबळे उपस्थित होते.
याप्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व कार्यकारी राजेंद्र यादव  यांनी गाळप हंगामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, सुमारे आठ हजार टन प्रतिदिन क्षमतेने ९ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप केले असून जिल्ह्यात ११.४१ टक्के इतका सर्वाधिक उतारा प्राप्त केला आहे.  सध्या नऊ हजार टन प्रतिदिन क्षमतेने गाळप सुरू आहे. आतापर्यंत ६ कोटी ५६ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून ३ कोटी ६० लाख युनिट वीज विक्री केली आहे. अल्कोहोलनिर्मिती ५५ लाख लिटर झाली असून त्याचा उतारा २९५ टक्के इतका उत्तम मिळालेला आहे. आता तीन ते साडेतीनलाख टन ऊस शिल्लक असून मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गाळप संपण्ार आहे. त्यामुळे उरलेल्या उस लवकर तुटणार असून भावही चांगला मिळणार आहे. त्यामुळे सोमेश्वरलाच ऊस घालावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 
जगताप म्हणाले, २८ फेब्रुवारीअखेर तुटणाऱ्या उसाच्या खोडव्याची नोंद देणे बंधनकारक होते. त्यामध्ये बदल केला असून हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसाच्या खोडव्याची नोंद शेतकरी देऊ शकतात. दरम्यान, नव्या ऊस लागवडींचीही मुदत २८ फेब्रुवारी होती. आता ३१ मार्चपर्यंत फुले २६५, को ८६०३२ व व्हीएसआय ८००५ या वाणांच्या रोप लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.
---
फोटो - सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे ११ लाख ११ हजाराव्या साखरपोत्याचे पूजन करताना संचालक मंडळ

--
Santosh Shendkar, Someshwarnagar
mo. 9011087479
To Top