बारामती ! उसाच्या फडात चालणारी ऊसतोड मजुरांच्या मुलांची पावलं...स्टेजवर थिरकतात तेंव्हा....

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शाळांचा स्नेहसंमेलनांचा मौसम सध्या सगळीकडेच सुरू आहे. ऊसतोडणी मजुरांची स्थलांतरीत होऊन कारखान्यावर आलेल्या मुले मात्र या मस्ती मजाकपासून वंचित राहतात. सोमेश्वर कारखान्यावर मात्र ऊसतोड मजुरांच्या मुलांचा आगळावेगळा सांस्कृतिक महोत्सव दणक्यात पार पडला. एरवी फडात, उसाच्या गाडीवर किंवा वाढे विकताना दिसणारी मुले महोत्सवात मात्र आपल्या नृत्याचे, गीतगायनाचे कौशल्य प्रकट करत होती.
ऊसतोडणी मजुरांची मुले नाईलाजास्तव सहा महिन्यांसाठी पालकांसोबत कारखान्यावर स्थलांतर करतात आणि शिक्षण व अन्य गोष्टींपासून दुरावतात. बारामती तालुक्यातील सोमेश्वर काऱखान्याने मात्र मुलांना अभ्यासात टिकवून ठेवण्यासाठी 'कोपीवरची शाळा' हा सायंकाळी चालणारा अभ्यासवर्ग दोन वर्षांपासून सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या मजुरांच्या मुलांचे स्नेहसंमेलन दणक्यात पार पडले. शेकडो ऊसतोड मजुरांनी, मुकादमांनी आणि परिसरातील संवेदनशील व्यक्तींनी या संमेलनास उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
संमेलनाचे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संचालक ऋषी गायकवाड होते. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव, विकास झेंडे, शबनम डफेदार, नंदकुमार होळकर, अनिल चाचर, गितांजली बालगुडे, स्वामी शेळके, रमेश कदम, रूपाली चाचर आदी उपस्थित होते. सुमारे दीडशे मुलांनी विविध नृत्ये व गाण्यांमध्ये सहभाग घेतला. एका वाहिनीवरील नृत्यामध्ये झळकलेला ऊसतोड मजुराचा मुलगा कार्तिक लोखंडे याच्या 'तेरी मिट्टी मे मिल जावा' या गाण्यावरील नृत्याला अक्षरशः डोक्यावर घेतले. पाटलाची बैलजोडी, झुमकेवाली पोरं, डान्स पे चान्स मार ले, रे मामा रे मामा, झुंजूमुजू पहाट झाली अशा गाण्यांवर मुलांनी धमाल केली. गवळण, लावणी, कोळीगीत यावरली नृत्ये सादर केली गेली. स्कूल चले हम या गाण्यावरील नृत्यातून मुलांनी ऊसतोडणी, बैल सांभाळणे, मूल सांभाळणे यामुळे शिक्षणाला वंचित रहात असल्याची चित्रमय व्यथा प्रकट केली.
यानिमित्ताने ऊसतोड मजूर विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून तयार केलेल्या टिकावू वस्तू, हस्तकला, चित्रकला, निबंध, प्रश्नमंजुषा आदी साहित्याच्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. बाबुलाल पडवळ यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले. नौशाद बागवान यांनी आभार मानले. संभाजी खोमणे, आरती गवळी, अनिता ओव्हाळ, अश्विनी लोखंडे, संतोष होनमाने, संतोष ठोकळे, विकास देवडे यांनी संयोजन केले.  
---
To Top