भोर ! संतोष म्हस्के ! पुन्हा एकदा स्थानिकांना टोल माफी सुरू : कृती समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे खेड-शिवापुर टोल प्रशासन नरमले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  
भोर : प्रतिनिधी
खेड -शिवापूर ता.भोर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी दि.-२ एप्रिल २०२३ रोजी पुकारलेल्या जनआंदोलनानिमित्त जिल्हाप्रशासनातर्फे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार दि.२७ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवापूर टोलनाक्यामुळे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कृती समितीने आक्रमकपणे भूमिका घेताच टोल प्रशासनाने नरमती भूमिका घेऊन स्थानिकांना पुन्हा टोल माफी सुरू केली.
      या बैठकीत भोर वेल्हा मुळशीचे आमदार संगम थोपटे यांनी १६ फेब्रुवारी २०२० रोजी कृती समितीने टोलनाक्यावर केलेल्या आंदोलनाच्या दरम्यान टोल प्रशासनाने टोलनाका स्थलांतरित होत नाही तो पर्यंत टोल वसुली करणार नाही अशी भूमिका घेतली होती व तसे पत्र कृती समितीला दिले होते. मात्र टोलवसुली पुन्हा सुरु करण्यात आली आहे. टोलवसुली तात्काळ थांबवावी व टोलनाका स्थलांतराचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.कृती समितीच्या वतीने कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी सदरचा टोलनाका हा PMRDA च्या हद्दीत येत असून वाढती नागरिकीकरण व औद्योकीकरण या भागात झाले आहे.दरम्यान हा टोलनाका या ठिकाणावरून स्थलांतरित होण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलने सन २०११ पासून येथे झालेली आहेत. म्हणून या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यावर टोल प्रशासनाचे अधिकारी अमित भाटिया यांनी "टोलनाका स्थलांतर करण्यास आमची तयारी आहे मात्र याबाबत NHAI ने निर्णय घ्यावा" अशी भूमिका मांडली. यानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असे आवाहन कृती समितीला केले. यावेळी बोलताना "टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव आता केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठवणार आहे. याबाबत संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून ३० मार्च २०२३ रोजी पुढील बैठकीचे नियोजन करण्यात येईल". यानंतर जोपर्यंत टोलनाका स्थलांतराचा निर्णय होत नाही तो पर्यंत स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी टोल प्रशासनाने मान्य करत एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे कृती समितीने दि. ०२ एप्रिल २०२३ रोजीचे जनआंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
      यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्गाने प्रकल्प संचालक संजय कदम,अतिरिक्त पोलीस अधीक्षक  भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, हवेली प्रांताधिकारी संजय असवले, भोर प्रांताअधिकारी राजेंद्र कचरे तसेच कृती समितीच्या वतीने आमदार संग्रामदादा थोपटे, कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर, डॉ. संजय जगताप, भोर तालुकाध्यक्ष शैलेश सोनावणे, भारतीय जनता पक्षाचे भोर तालुक्याचे उपाध्यक्ष राजेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभेचे युवक अध्यक्ष स्वप्नील कोंडे, शिवसेनेचे आदित्य बोरगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पांगारे, राष्ट्रशक्ती संघटनेचे शहाजी आडसूळ, गोरख मानकर, शुभम यादव आदी उपस्थित होते.
.
To Top